आता शेतसारा भरा ऑनलाईन; घरबसल्या कर भरता येणार

कराच्या वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते. तसेच वसुली वेळेवर होत नव्हती. थकीत कराची माहितीही खातेदारांना नसते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांमध्ये या सुविधेचा वापर केला जाणार आहे. राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होईल.
पुणे ः मनपा प्रॉपर्टी टॅक्सच्या धर्तीवरच आता शेतसारादेखील ऑनलाईन भरता येणार आहे. याची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे. या सुविधेमुळे शेती कर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर घरबसल्या भरता येणार आहेत. या करांच्या वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते. तसेच वसुली वेळेवर होत नव्हती. थकीत कराची माहितीही खातेदारांना नसते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांमध्ये या सुविधेचा वापर केला जाणार आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील एका गावाचा समावेश होणार आहे. प्रयोगाच्या यशस्वितेनंतर राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होईल.
शेतसारा म्हणजेच जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार आहे. इंग्रजांच्या आधीपासून जमिनीवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. पुढे नव-नवी करआकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारला जाणारा हा कर आजही कायम आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते.
शेतीचा कर हा अल्प असल्याने ती वसुली अपेक्षेप्रमाणे होत नाही. ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या सात-बारा उतारा ऑनलाईन असल्याने तलाठी कार्यालयातही जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही. या सुविधेमुळे सर्व्हे नंबर अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसार्याची रक्कम (जमीन महसूल) किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे. तसेच जमिनींचा अनधिकृत वापर सुरू असल्याची माहिती मिळणार असून, त्याचा दंडही ऑनलाइन भरता येईल.
भूमि अभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम तीन महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यासाठी संगणकप्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सांगितले. अनेक खातेदार हे शहरात राहतात. तर काही खातेदार नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. त्यामुळे या नागरिकांना आपल्या जमिनींच्या कराची माहिती मिळत नाही व कर जमा करण्यासाठी सुटीच्या दिवशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. नागरिकांना आता हा कर भरणे सोयीचे होणार आहे.