आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांना अजूनही मन:स्तापच!

पुणे ः शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या प्रसिद्ध झाल्या. दरम्यान, आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ दिवसभर बंद असल्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणार्या पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. यासंबंधी एसएमएस सोमवारीच मिळणे अपेक्षित होते, मात्र एसएमएस प्राप्त न झाल्यामुळे पालकांना मनःस्ताप सहन करावा लागला. आरटीई प्रवेशाची लॉटरी निघाल्यानंतर किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला याची माहिती देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले होते.
लाखो पालक एसएमएस येण्याची वाट पाहात होते; परंतु आरटीईची वेबसाइट अंडर मेंटेनन्स असल्याचे दिसत होते. जी संबंधित संस्था एनआयसी व सॉफ्टवेअर वापरते; परंतु साइट वेळेमध्ये सुरू न झाल्यामुळे पालकांना दरवर्षी मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
_मुकुंद किर्दत, आप पालक युनियन
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत वर्ष २०२२-२३ साठी शाळानिहाय आरक्षण ऑनलाइन सोडत मागील आठवड्यात काढण्यात आली. सोडतीनुसार विद्यार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाची माहिती उपलब्ध होईल. आरटीईसाठी प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे प्रवेश १९ एप्रिलपर्यंत संबंधित शाळांमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास त्याला मुदतवाढ देण्यात येणार आहे. ‘प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी १९ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या अॅलॉटमेंट लेटरवर सविस्तर सूचना दिल्या. त्याप्रमाणे पालकांनी कार्यवाही करावी.