आलिया-रणबीरची लेक, गिरवणार सिनेमाचे धडे! काश्मीरमध्ये शूटिंगसाठी पोहोचली राहा कपूर!

मुंबई : (Alia Bhatt – Ranbir Kapoor) प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा आगामी सिनेमा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या शेवटच्या टप्प्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हे चित्रीकरण काश्मीरमध्ये होणार आहे. याबाबत करणनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. चित्रीकरणाला रणवीर सिंहबरोबर आलिया भट्ट देखील सहभागी झाली आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया एकटी नाही तर तिची लेक राहा देखील तिच्याबरोबर गेली आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानं लिहिलं आहे की, ‘आमच्या सिनेमाच्या शेवटच्या टप्प्याचं चित्रीकरण सुरू झालं आहे. तब्बल सात वर्षानंतर मी दिग्दर्शन करत आहे. या सिनेमातील गाण्यातून माझ्या सर्वात लाडक्या फिल्ममेकरना मी श्रद्धांजली अर्पण करत आहे. यापेक्षा जास्त मी काय सांगू…’ या व्हिडिओमध्ये करण विमानात बसलेला दिसत आहे. त्याच्याबरोबर सिनेमाची टीम आहे. या सिनेमात रणवीर आणि आलिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रिपोर्टनुसार सिनेमातील गाण्याचं चित्रीकरण काश्मीरमध्ये होणार आहे. हे गाणं यश चोप्रा यांना समर्पित करण्यात आलं आहे.
मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार एक मार्चपासून म्हणजे आजपासूनच सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हे चित्रीकरण दहा दिवस चालणार आहे. करण, रणवीर आणि आलिया काश्मीरला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आलियाबरोबर तिची लेक राहा देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहाला पाहून सेटवरचे सर्वजण खूपच आनंदित आणि उत्साहित झाले होते. करण तर खूपच आनंदित झाला आहे. कारण त्याला राहाबरोबर वेळ घालवता येणार आहे.