कदम पुन्हा घसरले! ठाकरे-शिवसैनिकांची केली मुघलांशी तुलना; म्हणाले, “अफजल खान जसा लाखो लोक घेऊन…”
रत्नागिरी : (Ramdas Kadam On Uddhav Thackeray) खेडमधील गोळीबार मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्या रविवारी खेड येथील याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या जाहीर सभेचा टिझरही लॉन्च करण्यात आला आहे.
‘अफजल खान जसा लाखो लोक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून आला, अगदी तसेच उद्धवजी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते’, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. १९ मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
‘कोकणचा इतिहास असा आहे, ज्याच्या घरी आपण एक ग्लास पाणी पितो त्याची आठवण सुद्धा ठेवतो. ज्या झाडाच्या सावली खाली बसतो त्याची आठवण सुद्धा ठेवतो, असा कोकणचा इतिहास आहे. ही कोकणची संस्कृती आहे. पण भास्कर जाधव सारखी आणि खाल्लेल्या घराची वासे मोजणारी अवलाद जगात कुठेही मिळणार नाही. अशी बोचरी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.