कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, राजकारण्यांच्या बैठकावर बैठका, कोंडी फुटणार?

Onion Price : महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डोक्यावर कांदे घेऊन पोहोचले होते. नेत्यांच्या डोक्यावर टोपली होती, त्या टोपलीत कांदे होते. एनसीपी आमदारांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना कांद्याचे योग्य ते दर देण्याची मागणी केली. लासलगाव कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कांद्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. या सततच्या पडत्या दरांमुळे सोमवारी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव थांबवला. एपीएमसी भारतातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. कांद्याची प्रति किलो किंमत दोन ते चार प्रति किलो झाली असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राहणारे शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी ५१२ किलो कांद्याची विक्री केली. इतक्या कांद्याची विक्री करुन त्यांना केवळ २ रुपये देण्यात आले. सोलापूरमधील बाजारात आपला कांदा विक्रीसाठी आणताना त्यांनी ७० किलोमीटरचा प्रवास केला. पण त्याबदल्यात त्यांना केवळ २ रुपये मिळाले. हिवाळ्यातील मोसमात खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणात आलं. त्यामुळे बाजारात कांदा विक्रीनंतर त्यांना केवळ एक रुपया किलो दर मिळाला. कांदा विक्रीनंतर त्यांना पोस्ट-डेटेड चेक देण्यात आला जो पंधरा दिवसांनी क्लिअर झाला.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने तातडीने कांद्याला १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं. सध्या ३ रुपये, ४ रुपये आणि ५ रुपये किलोने विकला जाणारा कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जावा. या मागण्या पूर्ण न झाल्यास लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचा लिलाव सुरू होऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरुन अधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेत असल्याचीही माहिती आहे.