पांडुरंग परिवार नाराज: पुन्हा उपरा उमेदवार
उमेदवारीत ‘राम’ नाही
पंढरपूर | सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने राम सातपुते यांची जाहीर केलेली उमेदवारी पंढरपूरकरांना फारशी रुचली नाही . या उमेदवारीत ‘ राम ‘ नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघाचा एक प्रमुख एक गठ्ठा मतदार असलेल्या पांडुरंग परिवाराला यामध्ये विश्वासात न घेतल्यामुळे परिवारात प्रचंड नाराजी पसरली आहे.
प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील या परिवाराच्या अनेक शिलेदारांनी आज सोशल माध्यमांवरून आपल्या नाराजीला वाट करून दिली. त्यामुळे भाजपाच्या राम सातपुते यांना पंढरपूर मधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राम सातपुते यांच्यासह अमर साबळे ,चांगदेव कांबळे , संगीता जाधव यांची नावे चर्चेत होती शेवटच्या टप्प्यात तर पुन्हा शरद बनसोडे यांचेही नाव चर्चेत आले. सोलापूरला येथे सर्व सक्षम उमेदवार मिळत नव्हता. अखेर राम सातपुते या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात आली.
ते स्वतः देखील लोकसभेसाठी उत्सुक नसल्याचे समजते. परंतु कुठलाच पर्याय नसल्यामुळे शेवटी त्यांची निवड करण्यात आली. परंतु हे करत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही. किंबहुना पक्षाने येथील एकाही नेतृत्वाला याबाबत विचारले नसल्याचे समजते.
आमदार समाधान आवताडे यांचे देखील या मतदारसंघात हक्काचे मतदार आहेत परंतु त्यांना देखील अखेरपर्यंत राम सातपुते यांच्याबाबत विचारणा केली नसल्याचे सांगण्यात येते.
पांडुरंग परिवाराशी देखील याबाबत चर्चा झाली नाही. राम सातपुते यांना पंढरपूर , मंगळवेढा बद्दल कुठलाही जिव्हाळा नाही .त्यांनी पंढरपूरच्या दर्शनाला येण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कधीही कोणतीही भूमिका घेतली नाही.
आजपर्यंत भाजपाच्या माध्यमातून शरद बनसोडे आणि त्यानंतर महास्वामी या दोन्ही निष्क्रिय खासदारांमुळे प्रचंड अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे यंदा सर्व संमतीचा आणि सक्रिय असा आपल्या स्वतःचा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून येईल अशी अपेक्षा होती. परंतु राम सातपुते यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उपरा उमेदवार देत असताना कोणालाही न विचारता हा उमेदवार लादल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
परिवारात अंतर्गत मेसेज
राम सातपुते यांची उमेदवारी देत असताना पांडुरंग परिवाराला कुठेही विश्वासात घेतलेले नाही . ‘ प्रशांत परिचारक हेच आमचे मोदी आहेत ‘ , भाजपाला मनमानी निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ द्या. परंतु आमच्या मालकांचा स्वाभिमान जपण्याकरता आम्ही योग्य तो निर्णय घेऊ …. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या.
परिचारक यांची मजबुरी म्हणून त्यांनी उद्या सबुरीची भूमिका घेतली तरी त्यांचा स्वाभिमान जागृत राहण्यासाठी मतदार योग्य तो निर्णय घेतील , मेसेज पांडुरंग परिवारात फिरत आहेत.
मंगळवेढा मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे हा देखील विद्यमान उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांनी आज एक स्टेटस ठेवत चक्क नोटा ला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.