भूमी व जिंदगी विभाग स्थलांतरित करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा भूमी व जिंदगी (विशेष नियोजन प्राधिकरण) विभागाचा कक्ष आकुर्डी येथून चिखली येथे स्थलांतरित करण्यात आला. चिखली येथील जागा नागरिकांच्या गैरसोयीची असल्याचे हा कक्ष पुन्हा आकुर्डी येथील पूर्वीच्या ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर यांनी केली आहे.
पिंपरी ः सूरज बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक यांना निवेदन दिले आहे.
बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७ जून २०२१ रोजी निघालेल्या अधिसूचनेनुसार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित करण्यात आले. प्राधिकरणाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या भूखंडाची मालकी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे या भूखंडांचे हस्तांतर, कर्जासाठी ना हरकत दाखला देणे, वारस नोंद आदी कामांसाठी नागरिकांना सोयीचा पीएमआरडीए, आकुर्डी कार्यालयात जुलै २०२१ मध्ये भूमी व जिंदगी (विशेष नियोजन प्राधिकरण) नावाने कक्ष सुरू केला.
- हा कक्ष ११ मार्च २०२२ पासून जाधववाडी चिखली येथील राजे शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक दोन, सेक्टर क्रमांक १६ येथील सावतामाळी उद्यानातील व्यायामशाळेच्या इमारतीत स्थलांतरित केला आहे. राजे शिवाजीनगर, जाधववाडी चिखली हे आकुर्डी कार्यालयापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. इथे जाण्यासाठी रिक्षावाले नकार देतात, एखादा आलाच तर जास्त भाडे आकारले जाते. ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची सोय आहे ते या कार्यालयात जाऊ शकतात. मात्र इतरांची गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिकांना तर कसरत करावी लागते.
भूखंड हस्तांतरित करण्यासाठी नागरिकांना तीन ते चार वेळेला या कार्यालयात जावे लागते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला हस्तांतर फी सदराखाली लाखो रुपये उत्पन्न मिळते. नागरिक भूखंड हस्तांतरासाठी वरील कार्यालयात येऊ शकले नाही तर पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सुमारे आठ हजार भूखंड भाडेपट्ट्याने वाटप केलेले आहेत. यात चिंचवड, निगडी, आकुर्डी, चिखली, रहाटणी, वाकड, थेरगाव, रावेत, मोशी, भोसरी ही दहा गावे आहेत. या दहा गावांतील मध्य ठिकाण निगडी आहे.
येथे शहराच्या सर्व भागातून सहज पोहोचता येते. निगडी येथील कार्यालयाच्या जवळ रेल्वे स्टेशन आहे. पुणे-मुंबई रस्ता जात आहे. रिक्षा उपलब्ध आहे. बससेवा उपलब्ध आहे. निगडी येथे प्राधिकरणाची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध आहे. तसेच यापूर्वी पीएमआरडीएने निगडी येथील इमारतीमध्ये हा कक्ष स्थलांतरित करण्याबाबत सुचवले होते. मात्र महापालिकेने तिथे तो स्थलांतरित न करता चिखली येथे केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संत तुकाराममहाराज नावाचे व्यापारी संकुल आहे. या संकुलामध्येदेखील कार्यालयासाठी जागा उपलब्ध आहे. नागरिकांची गैरसोय दूर होण्याच्या, तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हे कार्यालय निगडी येथे स्थलांतरित करावे, असे निवेदनात म्हटले आहे.