मुरडे यांना ‘साहित्यसाधक’ पुरस्कार

पिंपरी ः पिंपरी- चिंचवड शहरातील ३५ संस्थांच्या एकजुटीचे प्रतिबिंब असलेल्या साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड शहर या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, कथाकार, गझलकार, कवी नंदकुमार मुरडे यांना ‘साहित्यसाधक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चिंचवडगाव येथे प्रा. तुकाराम पाटील, संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, कोषाध्यक्ष राज अहेरराव, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, सचिव सुहास घुमरे, सविता इंगळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन मुरडे यांना गौरविण्यात आले.
नंदकुमार मुरडे बालपणी श्रीक्षेत्र आळंदी येथे राहत होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाचे सुसंस्कार त्यांच्या मन, बुद्धी अन् आत्म्यावर कोरले गेले. शब्दांची फुले वेचित त्यांनी गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ साहित्यसेवा केली आहे.
संत ज्ञानेश्वरमहाराज यांचे पसायदान जीवनभर साहित्यिक वृत्तीतून अन् कृतीतून अंगिकारत शहरातील सर्व साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून आजही ते कार्यमग्न आहेत. साहित्यिकांचे प्रेरणास्रोत असलेल्या नंदकुमार मुरडे यांनी जीवनभर साहित्य साधना केली आहे म्हणूनच त्यांना ‘साहित्यसाधक’ पुरस्कार देऊन गौरविताना साहित्यिकांना आनंद झाला. याप्रसंगी श्रीकांत चौगुले, अशोक कोठारी, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, पंजाबराव मोंढे आदी उपस्थित होते.