
पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच भेट घेतली. संजय राऊत यांच्या मालमत्ताजप्तीचे प्रकरण ताजे असताना आणि मविआ अस्थिर करण्याच्या भाजपच्या हालचालींना वेग आला असताना घेतलेली ही भेट भाजप कार्यकर्त्यांना गोेंधळात टाकणारी आहे.
पुणे : भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन सर्वत्र साजरा होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटीची वेळ दिल्याने भाजपचे कार्यकर्ते पार गोंधळून गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या खासदारांना भेटत नाहीत, अशा तक्रारवजा बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. अशा पार्श्वभूमीवर मोदी यांनी शरद पवार यांना भेट दिली आणि २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ चर्चा केली. या भेटीच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसारित होऊ लागल्यावर भाजप कार्यकर्त्यांचा वर्धापनदिनाचा उत्साह मावळला.
गुढीपाडव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण संपताच प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींची धांदल उडाली होती. मोदी आणि पवार भेटीला २४ तास उलटून गेल्यानंतरही भाजपच्या गोटात सामसूम आहे आणि ही शांतता पुरेशी बोलकी आहे.
मोदी-पवार यांच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता नाही. या भेटीत पवार यांनी दोन मुद्दे त्यांच्या बाजूने मांडले. विधानपरिषदेवर १२ सदस्य नेमणुकीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे, तो विषय मंजूर व्हावा आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रॉपर्टीवर ईडीने जप्ती आणली, त्याबाबत नाराजी नोंदविणे, असे दोन विषय पवारांनी मांडले.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना अनेक वेळा अवमानकारक वागणूक दिली, शिवसेनेचे मुखपत्र असणार्या वृत्तपत्रातून राज्यपालांवर जहरी टीका करण्यात आली. याबद्दल महाराष्ट्रातील भाजपमध्ये आघाडीबाबत नाराजी आहे. संजय राऊत यांची भाषा भाजपत मान्य नाही आणि पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासात राऊत यांचे नाव पुढे आले आणि कारवाई झाली. मोदी यांच्याकडे ईडीविषयी तक्रार झाल्याने राऊत यांच्यावरील कारवाई थांबेल का? अशी शंका भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आघाडीतील गैरकारभाराविरोधात राज्यातील नेते लढत असताना मोदी-पवार भेट होते, गडकरी पवार आणि राऊत स्नेहभोजन होते, अशाने राज्यातील भाजप गोंधळला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून पवारांना दाद दिली जाणार नाही, दिल्लीपुढे झुकणार नाही म्हणणार्या पवारांना मोदींची भेट घ्यावीच लागली, असे दावे भाजपकडून सोशल मीडियावर केले जात आहेत. पण अधिकृत प्रतिक्रिया नाही. राऊतांची बाजू घेऊन पवार आणखी किती खाली घसरणार आहेत, अशी टिप्पणी माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदा आदी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. भाजप त्यासाठी सज्ज होत असताना मोदी-पवार भेटीच्या बातम्या आल्याने भाजपला थोडा ब्रेक बसला आहे. या भेटीचे भांडवल राष्ट्रवादीचे नेते भरपूर करतील, अशी शक्यता आहे.