“या चिमण्यांनो परत फिरा…” बंडखोरांना संजय राऊतांनी घातली पुन्हा एकदा साद!

मुंबई : (Sanjay Raut On Eknath Shinde Group) जेलमधून बाहेर आल्यावर संजय राऊतांनी शिवसेनेच्या बंडखोरांना साद घातली आहे. बंडखोरी केलेल्या सगळ्यांविषयी मनात ओलावा आहे. काही लोक नक्कीच माघारी फिरणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे यांनी पक्ष सोडून शिवसेनेवर टीका केली. परंतु शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्याबाबतीमध्ये मी नक्कीच त्यांना मानतो, असं राऊत म्हणाले.
”जे सोडून गेले त्यांना शिवसेनेने कधी काही कमी केलं नाही. पक्षाच्या प्रमुखाला कधीच एकावेळी सर्वांना खूश करता येत नाही. बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करुन उभी केलेली शिवसेना संपवण्याचा विचार करणं चुकीचं आहे. हा मराठी माणसाचा घात करणारा विचार आहे. गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. काही लोक नक्कीच माघारी फिरतील. आमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी ओलावा आहे” असं म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे बंडखोरांना साद घातलीय.
मला तडजोडीची संधी होती. परंतु पक्षासाठी मी तुरुंगवास स्वीकारला. बंडखोरांवरही दबाव होता. त्यांना तुरुंगात जायचं नसेल म्हणून ते तिकडे गेले. अनेक जण संपर्कात आहेत, ते सगळं सांगतात. त्यांचं ‘मातोश्री’शी भावनिक नातं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनातदेखील सगळ्यांबद्दल प्रेम, ओलावा होता. असं संजय राऊत मुलाखती दरम्यान म्हणाले.