मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका पाठोपाठ दोन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यावर आता त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नाईक यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज माध्यमांशी दिली आहे.
गणेश नाईक यांनी एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या संबंधातुन त्यांना एक अपत्य देखील झालं आहे. पण, भाजप आमदार गणेश नाईक यांनी या अपत्याचा स्वीकार केला नाही. यामुळे पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.
गणेश नाईक आणि आपण १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून मला १५ वर्षांचा मुलगा आहे. पण, नाईक यांनी माझ्या मुलाचा स्वीकार करण्यास नकार दिला. अनेकवेळा माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी नाईक यांनी दिली. असे देखील या महिलेने तक्रारीत सांगितले आहे. यामुळे आता गणेश नाईक यांची अटक अटळ मानली जात आहे.