नाइन्टी नाइन क्लबचे मेंबर?

member od 99 club

आपण आयुष्यात उच्च ध्येय ठेवणं चुकीचं नाही, मात्र शिखरावर पोहोचताना ध्येयापेक्षा त्या प्रवासाला अधिक महत्त्व असतं, हे लक्षात ठेवायला हवं. आपण लोभ, मोह याच्यामागे झपाटल्यासारखं लागलो तर कायमच असमाधानी राहू यात शंकाच नाही. अशा ‘99 Club’चा मेंबर होण्यासाठी फी शून्य लागते, पण त्यातून बाहेर पडण्याची मात्र फार मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच म्हणतात, Life is a journey not a destination. आपण समाधान मिळवण्याचा प्रवास करायचा आहे आणि आनंद प्राप्तीच्या मोहाने ‘99 Club’ चे मेंबर तर आपण होत नाही आहोत ना, याचं भानही राखायचं आहे.

राष्ट्रसंचार कनेक्ट

एक अत्यंत धनाढ्य राजा सार्‍या सुखसुविधा, संपत्ती असूनही आनंदी नव्हता, समाधानी नव्हता. एके दिवशी त्याने आपल्या सेवकाला आनंदाने गाणं गात काम करताना पाहिलं. राजाला आश्चर्य वाटलं की, मी या देशाचा राजा असूनही मी दुःखी, उदास आणि तो गरीब सेवक मात्र इतक्या आनंदात कसा? शेवटी त्याने सेवकाला विचारलंही, तू इतका आनंदी कसा काय? तेव्हा तो म्हणाला,” महाराज, मी एक अगदी सामान्य माणूस आहे. पण आम्हाला फार काही लागत नाही. डोक्यावर छत आणि पोट भरेल इतकं अन्न मिळालं की, आम्ही समाधानी असतो. पण राजाला आपल्या त्या सेवकाचे उत्तर पटले नाही म्हणून त्याने आपल्या विश्वासू मंत्र्याला विचारले. राजाची शंका आणि त्या सेवकाची गोष्ट ऐकल्यावर तो मंत्री म्हणाला, “मला वाटतं तो सेवक ‘99 Club’चा भाग झाला नसावा अजून.

ते ऐकल्यावर आश्चर्याने राजाने मंत्र्याला विचारलं, ‘99 Club’? म्हणजे नेमकं काय? महाराज, आपण ९९ मोहरा भरलेली थैली त्याच्या घराबाहेर ठेवा. राजाने तसे करवून घेतले. जेव्हा त्या सेवकाला ती थैली आपल्या घराबाहेर दिसली तेव्हा त्याने ती आत नेली. त्यातील सुवर्णमुद्रा पाहून तो हर्षभरित झाला. मोहरा मोजल्यावर त्या ९९ भरल्या. शंभरावी सुवर्णमुद्रा गेली तरी कुठे म्हणून तो शोधायला लागला. खूप शोधल्यावरही ती सापडेना म्हणून थकून तो विचार करायला लागला की, कोणी ९९ सुवर्णमुद्रा कशा काय ठेवेल? पण शंभरावी नाहीये हेही खरं. त्याने ठरवलं की, कठोर परिश्रम करायचे म्हणजे शंभरावी सुवर्णमुद्रा घेता येईल. त्या दिवसापासून त्या सेवकाचं आयुष्यच बदललं. तो अक्षरशः यंत्राप्रमाणे, रात्रंदिवस झपाटल्यासारखा काम करायला लागला. कुटुंबातल्या सगळ्यांनी त्याला मदत करायलाच पाहिजे म्हणून आरडाओरड करायला लागला. काम करताना त्यांचं गाणं म्हणणं ऐकू येईनासं झालं. राजानेही ते पाहिले. त्याच्यातला हा बदल पाहून राजाने मंत्र्याला कारण विचारलं, तेव्हा मंत्र्याने उत्तर दिले की, आता तो सेवक ‘99 Club’ चा मेंबर झालाय.

ही कथा वाचनात आली आणि वाटलं सध्याच्या काळात आपल्यापैकी खूपच जण ‘99 Club’चे मेंबर झालो आहोत. प्रत्येकाला त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिकच भूक आहे. पैसे सगळ्यांजवळ आहेत. आपल्या गरजाही भागताहेत. सुखासमाधानाने जगतोय, पण यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय. पुरेसं होईल असं घर आहे, पण प्रशस्त तीन-चार बेडरूमचं घर हवंय. घरात बर्‍यापैकी मोठा टी.व्ही. आहे, पण सोनीचा सगळ्यात मोठा टी. व्ही. हवाय. ब्रँडेड म्युझिक सिस्टिम, फ्रीज, झुळझुळीत पडदे, ए.सी., महागडी कार, परफ्यूम्स, कपडे, हॉटेलिंग, मोबाइल मिळवण्यासाठी या ‘99 Club’च्या मेंबर्सची रात्रंदिवस धावपळ चाललीये. पैशाबरोबरच ऑफिसमध्ये, राजकारणात अधिक उच्च पदं, अधिक सत्ता या हव्यासाचा कडेलोट होतोय. मुलांना शंभरपैकी ९९ मार्क मिळाले तर एक मार्क नेमका कुठे गेला हे शोधायला ९९ मार्क मिळाल्याचा आनंद पालक हरवून बसताहेत.

  • पहा बांग्लादेश स्वातंत्र्यसंग्राम आणि भारताची कामगिरी
admin: