ताज्या बातम्यापुणे

पीएमपीमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट; वर्षभरात तब्बल सव्वा कोटीचा दंड वसूल

पीएमपीमधून प्रवास करण्यासाठी बसचे किमान तिकीट दहा ते पंधरा रुपये, लांब पल्ल्यासाठी जास्तीत जास्त ४० ते ६० रुपये आहे. तरीदेखील गर्दीत कोण विचारते, असा समज करून तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. मात्र, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी पकडल्यावर पाचशे रुपयांचा दंड भरावा लागतो. दररोज ६० ते ७० जणांना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षभरात या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून सेवा दिली जात आहे. या बसमधून दररोज ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामधून पीएमपीला दीड ते दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या बसची संख्या कमी झाल्यामुळे बसला गर्दी वाढू लागली आहे. या गर्दीत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे पीएमपीकडून बसमध्ये अशा प्रकारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी तिकीट तपासणीस (चेकर) ची पथके नेमण्यात आली आहेत.

या पथकांकडून वेगवेगळ्या मार्गांवर अचानक जाऊन बसची तपासणी केली जाते. त्यामध्ये महिन्याला दीड ते दोन हजार फुकटे प्रवासी सापडतात. पीएमपीचे तिकीट कमीत कमी पाच रुपये, तर जास्तीत जास्त ८० रुपयांपर्यंत आहे, तरीही काही प्रवासी तिकीट घेण्यात टाळाटळ करत असतात. या फुकट्या प्रवाशांमध्ये महाविद्यालयीन तरुण- तरुणांचीच संख्या अधिक वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे वारंवार पीएमपी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.

तिकीट तपासणीसाठी साडेतीनशे कर्मचारी
पीएमपीत ३५० कर्मचारी तिकीट तपासण्याचे काम करतात. त्यांना यासाठी खासगी चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. तिकीट चेकरची पथके ३७९ पेक्षा अधिक मार्गांवर जाऊन बसची तपासणी करतात. विनातिकीट आढळून आल्यास प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. गतवर्षी १ कोटी १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये