मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

पुणे | Maharashtra Bus Accident In MP – आज (सोमवार) सकाळी मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. बचावकार्य व्यवस्थित पार पडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली आहे. यावेळी त्यांनी मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. “मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिले आहेत.”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसंच राज्यपरिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेत. तातडीने बचावलेल्या प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.