दहावी बारावीची पुरवणी परीक्षांची तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावी(SSC/HSC Exam) बारावीची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै पासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै या कालावधी तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये २० हजार ३७० मुले आणि ८ हजार ६०५ मुली आहेत. त्याचबरोबर एक ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली आणि पाच ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात अकरा वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल. दुपारच्या सत्रात अडीच वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालणार उपस्थित राहणे आवश्यक आहे. दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल.
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये परीक्षेमध्ये पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत देखील पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिली जाणार आहे. पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी इत्यादी परीक्षांचे ऑनलाईन पद्धतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत.