ताडोबा सफारी ऑनलाइन बुकींगच्या नावाखाली 12 कोटींना गंडा, 2 जणांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा झटका बसला आहे. ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी डब्ल्यूसीएस कंपनीसोबत करार करण्यात आला होता. मात्र, डब्ल्यूसीएस कंपनीनं ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची 12 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रामगनर पोलिसांनी प्रतिष्ठित कुटुंबातील 2 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर अशी आरोपींची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडोबा सफारीसाठी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला होता. ही कंपनी आरोपी रोहित विनोदकुमार ठाकूर आणि अभिषेक विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे. तसंच आरोपींनी केलेल्या फसवणूकीनंतर ताडोबा अंधारी अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन ही कंपनी करारानुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकींग करू शकत होती. त्यामुळे या कंपनीला 2020 ते 2023 या कालावधीमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे 22 कोटी 20 लाख एवढी रक्कम जमा करायची होती. मात्र, या कंपनीनं 10 कोटी जमा केल्याचा आरोप सचिन शिंदे यांनी केला आहे. तसंच या कंपनीनं ताडोबा व्यवस्थापनाची 12 कोटी 15 लाख 50 हजारांनी फसवणूक केली आहे.