“…तर एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील अन् हे सरकार पडेल”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य
मुंबई | Ulhas Bapat – काल (20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वादाबाबत सुनावणी पार पडली. ‘शिवसेना’ (Shivsena) पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा सांगितला. निवडणूक आयोगानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 30 तारखेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तसंच निवडणूक आयोगासमोरील सुनावणीनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर हे सरकार पडेल, अशी शक्यता उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी वर्तवली आहे. ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यावेळी उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणाले की, “या प्रकरणाचं सध्या दोन ठिकाणी कामकाज सुरू आहे. एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून ती पूर्णपणे स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाला राज्यघटनेच्या 15 व्या परिशिष्टानुसार प्रचंड अधिकार दिले आहेत. सध्याचं प्रकरण हे कलम 324 अंतर्गत दिलेले अधिकार आणि ‘इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर- 1968’ या कायद्यानुसार सुरू आहे. जर एका पक्षात दोन गट पडले तर कोणत्या गटाला मान्यता द्यायची? आणि पक्षचिन्ह कोणत्या गटाला द्यायचं? याबाबत निवडणूक आयोग ठरवतो.”
“तसंच येथे सर्वात मोठी समस्या अशी आहे की सर्वोच्च न्यायालयात दुसरं प्रकरण सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागायच्या आधी निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय दिला, तर तो कदाचित ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या मते हस्यास्पद ठरू शकतो,” असंही उल्हास बापट म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यघटनेचं दहावं शेड्युल असं सांगतं की, पक्षातून एकाच वेळी दोन तृतीयांश लोक बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात सामील झाले तर ते वाचतात, अन्यथा ते अपात्र ठरतात. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले 16 आमदार हे दोन तृतीयांश नाहीत. तसंच ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात सामील झालेले नाहीत. त्यामुळे ते आमदार अपात्र ठरण्याची शक्यता दांडगी आहे. जर संबंधित सोळा आमदार अपात्र ठरले तर त्यामध्ये एकनाथ शिंदे हे देखील आहेत. ते सुद्धा अपात्र ठरतील. एकनाथ शिंदे पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर अपात्र ठरले तर त्यांना मंत्री राहता येणार नाही. म्हणजेच त्यांचं मुख्यमंत्रीपदही जाणार. याचाच अर्थ असा की हे सरकार पडेल. संबंधित सोळा आमदार जर अपात्र ठरले तर बाकीचे आमदारही अपात्र ठरतील”, असंही उल्हास बापट यांनी सांगितलं.