पुणे : शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील. तसेच आयुक्तालयाला नवीन वाहनांसाठी दोन कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल, तसेच आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे मंजुरीसाठी देखील प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पालकमंत्री पाटील यांचा शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली.
दामिनी पथकाला हिरवा झेंडा…
पोलीस आयुक्तालयांतर्गत दामिनी पथक कार्यान्वित केले आहे. सहायक आयुक्तांच्या विभाग स्तरावर हे पथक कार्यरत राहणार आहे. एका विभागासाठी तीन दुचाकी या पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी २४ महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनी तसेच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पथक सजग राहणार.
शहर पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन आढावा घेतला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, महापालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके, एकनाथ पवार उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी व मुख्यालयासाठीच्या जागांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील. तसेच सायबर पोलीस ठाणे मंजुरीसाठी देखील प्रयत्न केले जातील.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आणखी वाहने पाहिजे आहेत. त्यासाठी चार कोटींच्या निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.