पुणे

Police Bharti 2024: पुणे पोलीस भरतीसाठी २० हजार ३८२ अर्ज दाखल

पुणे पोलीस दलातील २०२ पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पाषाण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालय, खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर पोलीस भरती मैदानी चाचणी पार पडणार आहे. पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, तसेच कारागृह विभागातील १२१९ पदांसाठी तब्बल एक लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरतीप्रक्रिया उद्या बुधवार १९ जूनपासून सुरू होणार आहे.

पुणे पोलीस दलातील २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज दाखल झाले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी तीन हजार १८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणीचा टप्पा बुधवारपासून सुरू होणार आहे. पुणे पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंदकुमार चावरिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. खुल्या गटासह एकंदर अकरा प्रकारच्या जातीय आणि आर्थिक प्रवर्गांच्या माध्यमातून भरती प्रक्रियेतून पदे भरली जाणार आहेत.

भरतीसाठी पारदर्शी आणि काटेकोर निवड प्रक्रिया राबवली जाणार असून, गैरप्रकाराची माहिती मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक थम्बसह व्हिडीओ चित्रीकरणाचे पर्याय वापरण्यात येणार आहेत. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या प्राथमिक पडताळणीनंतर निकषात बसलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा दिनांक आणि वेळ अधिकृतरीत्या कळवण्यात आली आहे. पुणे शहराबरोबरच कारागृह विभागाच्याही पोलीस भरतीची जबाबदारी शहर पोलिसांकडे आहे. उमेदवारांना कळविण्यात आलेल्या आलेल्या भरती प्रक्रियेसाठी त्यांना कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही, तर त्यांना दिनांक बदलून मिळणार नाही. तसेच, त्यांना दुसरी संधीही देण्यात येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) ३६२ जागांसाठी भरतीप्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडीतील मुख्यालयात भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांनी बुधवारी सकाळी पाच वाजता अलंकारन हॉल परिसरात ओळखपत्रासह उपस्थित राहावे. पावसामुळे मैदानी स्पर्धा न झाल्यास उमेदवारांना पुढील दिनांक कळविण्यात येईल, असे समादेशक नम्रता पाटील यांनी सांगितले. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच, कोणी गैरप्रकार करत असेल, तर त्याबाबत माहिती देण्यासाठी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पुणे शहर पोलीस दलात २०२ पोलीस शिपाई, चालक, कारागृह विभागात ५१३ शिपाई, पुणे लोहमार्ग विभागात ५० पोलीस शिपाई आणि १८ पोलीस शिपाई, चालक आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात ४४८ पोलीस शिपाई आणि ४८ चालक पोलीस शिपायांची पदे भरली जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये