“26/11 चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला…”, देवेंद्र फडणवीसांचं ‘त्या’ आरोपांवर चोख प्रत्युत्तर

पुणे | Devendra Fadnavis On Nana Patole – दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंबानी यांच्या निवासस्थानी जी स्फोटकं सापडली होती ती देवेंद्र फडणवीसांनीच ठेवली होती, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला होता. तर आता नाना पटोलेंच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज (18 मे) पुण्यात भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, “नाना पटोलेंना अवाॅर्ड दिला पाहिजे. ते म्हणाले, अंबानींच्या घरापुढे स्फोटके मी ठेवली. तर आता मला इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट द्यावं की, 26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला.”
“वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्यासाठी 2017 साली उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला. माझ्याकडे मंत्री आले, दबाव आणला की साहेबांनी आग्रह धरला आहे. वाझेला काहीही झालं तरी पोलीस दलात परत घ्या. पण मी म्हटलं की, मी वाझेला परत घेणार नाही, तसंच फाईलवरही लिहिलं की मी परत घेणार नाही”, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
नाना पटोलेंनी नेमके काय आरोप केले?
“मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर स्फोटकं सापडली, अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले, हे सगळं महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून करण्यात आलं होतं. त्यामागे देवेंद्र फडणवीस होते हे मी विधानसभेत म्हटलं होतं. तसंच आता ते स्पष्ट झालं आहे”, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी 16 मे रोजी केला होता.