देश - विदेश

भीषण! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास ७० हून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केले आहे. याव्यतिरिक्त पुदुच्चेरीमध्येही १५ जणांना विषारी दारू प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- भारतातून कोट्यधीशांचे स्थलांतर सुरुच; यावर्षीही तब्बल ‘एवढे’ धनाढ्य देश सोडणार

नेमकं काय घडलं?

तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवारी रात्री मोठ्या संख्येनं रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी कल्लाकुरीची रुग्णालयात दाखल झाले. त्याव्यतिरिक्त विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

हेही वाचा- “एनडीए सरकार संकटात? कारण…”; राहुल गांधी यांच्या ‘त्या’ दाव्याने चर्चांना उधाण

रात्रभरात या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे उपचारांदरम्यान आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यातही अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- नितीश कुमार सरकारला हायकोर्टचा मोठा झटका; बिहारमधील ६५ टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द

पोलिसांची कारवाई, एकाला अटक

दरम्यान, या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून एका व्यक्तीला अटकदेखील केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात ४९ वर्षीय गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी या व्यक्तीला अटक केली आहे. बेकायदेशीररीत्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल २०० लिटर अरकचे कॅनही जप्त केले आहेत. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये विषारी मिथेनॉलचं मोठं प्रमाण असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये