महाराष्ट्रशिक्षण

राज्यात ३७ हजार बोगस परिचारिका?

वैद्यकीय शिक्षण विभाग करणार चौकशी

मुंबई ः महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने नोंदणी केलेल्या परिचारिकांमध्ये बोगस परिचारिकांचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता मागील चार वर्षांत सुमारे ३७ हजार परिचारिकांची नोंदणी झाल्याचे सांगण्यात येते. राज्य सरकारने आता या परिचारिकांच्या पात्रतेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या परिचारिकांनी कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावले आहे. आता गरज संपल्यानंतर नोकरीवरून कमी करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

या राज्यासह देशभरात आणि परदेशात कागदोपत्री, नोंदणीकृत परिचारिका कार्यरत आहेत. परिचारिकांच्या या नोंदणीबाबत राज्य सरकारला गोपनीय अहवाल सादर करण्यात आला असून, पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे, अशी चर्चा सध्या सुरू असल्याचे समजते. दरम्यान, दाखल तक्रारींनुसार, या परिचारिकांच्या पदविका, उत्तीर्ण प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रिकांची पडताळणी झालेली नाही. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने २०१६ मध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती. उमेदवाराचे नाव यादीत आहे आणि त्याच्या नावाविरुद्ध कोणती कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्याची पडताळणी केली आहे, याची माहिती नमूद केलेली नाही.

कोणतीही कागदपत्रे न तपासता राज्यात जवळपास ३७ हजार परिचारिकांची नोंदणी केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या प्रभारी कुलसचिव रिचेल जॉर्ज यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळात कौन्सिलच्या कार्यालयामध्ये या नर्सेसना येणे शक्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांची नोंदणी केली असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले आहे. नोंदणी केली नसती, तर संबंधित परिचारिकांचे एक वर्ष वाया गेले असते, असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन बोर्डाच्या एका महिला अधिकाऱ्याचा फोन आल्याचा दावाही जॉर्ज यांनी केला आहे. तर आपण केवळ सूचनांचे पालन केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तयार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ही वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी करावी लागते. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका म्हणून काम करता येत नाही. नर्सिंगचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौन्सिलच्या कार्यालयात गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. कोरोना काळात छापील गुणपत्रिका देण्यात आली नव्हती.

कोरोना काळात मदत…

-नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारावर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने या नव्या नर्सेसची नोंदणी केली होती.
-महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या काळामध्ये आरोग्य सेवेत या नर्सेसची मोठी मदत झाली होती. आता कोरोनाची परिस्थिती कमी झाल्यानंतर या सगळ्याच ३७ हजार नर्सेसना बोगस ठरवणे चुकीचे असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये