एसटीच्या ताफ्यातील डीझेल वरील पाच हजार बस सीएनजीवर चालणार
राज्य शासन देणार ९७० कोटी रुपये
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील पाच हजार बस डीझेल वरून सीएनजी मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासन एसटीला ९७० कोटी रुपये देणार आहे. सीएनजी मध्ये रुपांतर झाल्यानंतर बस मधून होणाऱ्या वायू प्रदूषणात घट होईल.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी हरित परिवहन या बाबी अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डीझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (सीएनजी) इंधनावरील वाहनात रूपांतरण करण्यात येईल’ असे जाहीर केले.
त्यानुसार महामंडळाच्या २२ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत पाच हजार डीझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधन या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येक बसला १९ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे. पाच हजार बस साठी लागणाऱ्या ९७० कोटी रुपये निधीची महामंडळाने शासनाकडे मागणी केली आहे.
राज्य शासन हा निधी एसटीला चार वर्षांच्या टप्प्यांत देणार आहेत. सन २०२४-२५ मध्ये ४० कोटी रुपये, सन २०२५-२६ मध्ये २०० कोटी रुपये, सन २०२६-२७ मध्ये ३७० कोटी रुपये आणि सन २०२७-२८ मध्ये ३६० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.