मेक्सिकोमध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप

पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा
मेक्सिको : मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्याजवळ सोमवारी दुपारी एकच्या सुमारास (भारतीय वेळेप्रमाणे रात्री ११:३०) भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत. पश्चिम मेक्सिकोतील मांझानिलो शहरात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.६ नोंदवली गेली. कोलिमा राज्यातील मांझानिलो शहरात दुकानाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, प्रशासनाने पश्चिम किनारपट्टीवर सुनामीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम किनारपट्टीपासून ५०० किमी अंतरावरील राजधानी मेक्सिको सिटीमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
दरम्यान, सुदैवाने राजधानीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू मिचोआकान राज्यातील कोलकोमनपासून ५९ किमी दक्षिणेस, पॅसिफिक किनारपट्टीजवळील जमिनीपासून १५ किलोमीटर अंतरावर होता. सोमवारी झालेला भूकंप बरोबर सप्टेंबर महिन्यात झाला होता. मुळात याच महिन्यात १९८५ आणि २०१७ मध्ये भूंकप झाला होता. १९ सप्टेंबर १९८५ रोजी मेक्सिको शहरात ८.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो इमारतींचे नुकसान झाले होते. तर २०१७ मध्येदेखील याच दिवशी ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये सुमारे ३७० नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शनिवारी भूकंपाच्या धक्क्यांनी तैवानची आग्नेय किनारपट्टी हादरत होती. या वेळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार धक्का बसला आहे.