पुणे विभागातील एसटी ताफ्यातून ७२ बस होणार बंद
श्रावण महिना सुरू झाल्यापासून भारतामध्ये सणासुदीला सुरुवात होते. लवकरच गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जात असतात. शिवाय अनेक लोक आपल्या पाहुण्यांच्या गाठीभेटी घेत असतात. त्यानिमित्ताने सणासुदीच्या दिवसात एसटीचा प्रवास आवर्जून केला जातो. मात्र खेडोपाडी जाणाऱ्या एसटीच्या ताफ्यात आता घट होणार आहे विशेषतः पुणे विभागाच्या बाबतीतली एक महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे.
उद्यापासून म्हणजे २९ तारखेपासून एसटी महामंडळाच्या ताफ्यातून ७२ बसेस बंद होणार आहेत. ७२ जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची नक्कीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाच्या १२ आगारा अंतर्गत ७२ जुन्या बसेस स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे एसटी विभागात सध्या 855 बसेस कार्यरत आहेत. त्यातल्या ६४ बसेस या ई बसेस आहेत तर ७२ बस आहेत त्यांचं आयुर्मान संपलं असल्या कारणाने या बसेस स्क्रॅप करण्यात येणार आहेत.
७२ बसेस स्क्रॅप करण्याचे नियोजन प्रशासनाने २९ ऑगस्ट रोजी केले आहे. त्यामुळे या बसेस स्क्रॅप केल्यानंतर पुणे विभागाच्या ताफ्यामध्ये ७८३ बसेस शिल्लक राहणार आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे पुणे विभागातील प्रवाशांना आता बसचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. तर प्रवास करताना एसटीच्या प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. महाराष्ट्र मध्ये आजही एसटी ही गाव खेड्यापर्यंत पोहोचते त्यामुळे विशेषतः या गाव खेड्यातील लोकांना शहरापर्यंत आणण्याचं काम या एसटी मार्फत होत असतं आणि अशा प्रवाशांचा आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये खोळंबा होण्याची शक्यता आहे.