भारतात मागील १० वर्षांमध्ये वायू प्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकेने म्हटले आहे. मागील १० वर्षात हवा प्रदूषणामुळे मृत्यू होण्याची भारतीयांची संख्या ४३ लाखांवरून ७३ लाखांपर्यंत पोहचली असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.
दीर्घकालीन प्रदूषणामुळे लाखो भारतीयांचा जीव जातोय
‘लॅन्सेट’च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हवामानातील PM2.5 कणांचा दीर्घकाळ संपर्क भारतातील लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासामध्ये देखील वायू प्रदूषणाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे भारतात लाखो लोकांचा जीव जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामानातील PM2.5 ठरतायत आरोग्याला घातक
‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ‘ जर्नलमध्ये प्रकाशित झालेले हे संशोधन शरीरासाठी घातक असलेल्या हवामानातील PM2.5 या लहान वायु प्रदूषण कणांवर केंद्रित आहे. ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटरपेक्षा देखील लहान असतो. हे कण मानवी फुफ्फुसात खोलवर जाऊन रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे नियम कडक करण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची गरज देखील या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
१० वर्षात 655 जिल्ह्यांतील माहितीचा आढावा
या संशोधनात 2009 ते 2019 दरम्यान भारतातील 655 जिल्ह्यांतील डेटा गोळा करण्यात आला आहे. येथील हवामानातील PM2.5 पातळी त्यांचा मानवी आरोग्यावरील परिणाम आणि हवामानातील या घटकाचा मृत्यूशी संबंध जोडण्यात आला आहे. हवामानातील पीएमची (PM) पातळी १० मायक्रोग्राम प्रति घनमीटर वाढली की, मृत्यूमध्ये 8.6% वाढ होते, असे अभ्यासात आढळले आहे. मागील दशकभरात भारतात प्रति घनमीटर 40 मायक्रोग्रॅम इतकी पीएमची (PM) पातळी वाढली आहे. काही वर्षात भारतात अंदाजे ३८ लाख मृत्यू झाल्याचे ‘द लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.
‘WHO’च्या अहवालापेक्षा अभ्यासातील आकडेवारी घातक
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कठोर मार्गदर्शक तत्त्वांच्या तुलनेत ही आकडेवारी आणखी गंभीर बनते, कारण यामध्ये प्रति घनमीटर फक्त 5 मायक्रोग्राम मर्यादेचा उल्लेख करण्यात आला होता. या बेंचमार्कचा वापर करून, अभ्यासाचा अंदाज आहे की, 16 लाख 60 हजार मृत्यू हे मागील १० वर्षात झालेल्या सर्व मृत्यूंपैकी जवळजवळ एक चतुर्थांश मृत्यू कहे वायू प्रदूषणाशी जोडले जाऊ शकतात. धक्कादायक म्हणजे, भारतातील प्रत्येक व्यक्ती अशा भागात राहतो जिथे PM2.5 पातळी WHO मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. काही प्रदेशांमध्ये, हवेतील पीएम 2.5 (PM2.5) चे प्रमाण 119 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी उच्च झाली आहे, जी WHO च्या सुरक्षित मर्यादेच्या जवळपास 24 पट आहे.