आफ्रिकेतील नायजेरिया देशात फूकट पेट्रोल मिळवण्याची हाव तब्बल ९० जणांचा जीवावर बेतली आहे. पेट्रोल टँकर स्फोटात ९० जण ठार झाल्याचे वृत्त ‘एपी’ने दिले आहे. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पेट्रोल टँकरला अपघात झाला. तो पलटी झाला. यावेळी फूकटचे पेट्रोल मिळण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. या गर्दीत स्फोट झाल्याने ९० जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
जिगावा राज्यातील माजिया शहरात मध्यरात्री हा स्फोट झाला, जेव्हा विद्यापीठाजवळील महामार्गावरून प्रवास करताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टँकर पलटी झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी टँकरकडे धाव घेतली. ते पेट्रोल काढू लागले. याचवेळी प्रचंड मोठा स्फोट झाला. भीषण आग लागली. या आगीत ९० पेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिस प्रवक्ते लावन ॲडम यांनी दिल्याचे वृत्त ‘एपी’ने दिले आहे.