राष्ट्रसंचार कनेक्टविश्लेषणसंपादकीय

छुप्या हिटलरशाहीचा अजेंडा!

ज्या अखंड भारताचा भागवत उल्लेख करतात, अगदी त्याच देशांना एकत्र करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सार्क परिषदेची स्थापना १९८५ ला केली होती. मात्र त्याला हिंदुत्वाचा मुलामा दिलेला नव्हता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षांत अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पाहायला मिळेल असं विधान केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षांत पुन्हा एकदा अखंड भारत होईल, याचा संदर्भ देताना संघ किती बुरसटलेल्या, जुनाट, अवैज्ञानिक विचारसरणीचा आहे हेही त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी १४ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांनी आपले पुस्तक ’बंच ऑफ थॉट्स’मध्ये विस्तृत भारताचा उल्लेख करताना अखंड भारताची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, बर्मा, नेपाळ, भूतान, तिबेट, मालदीव आणि श्रीलंकेपर्यंत भागांचा अखंड भारतात समावेश आहे.


आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं, मग काय करणार? असं म्हणत छुपी हिटलरची प्रवृत्ती त्यांनी हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतर १००० वर्षांत देशाला लाभलेला पहिला हिंदू शासक असंही वादग्रस्त विधान भागवतांनी केलं होतं. याचा अर्थ नेहरू, शास्त्री, वाजपेयी हिंदू नव्हते?


ज्याला संघ परिवार अखंड भारत म्हणतो त्या अखंड भारतावर आजपर्यंत इतिहासात कधीही एकछत्री अंमल नव्हता. अगदी चंद्रगुप्ताच्या काळापासून देशात अनेक लहान राज्ये होती. त्यांची स्वतःची नाणी होती. शेजारील राष्ट्रांशी त्यांचे संबंध स्वतंत्र राज्य म्हणून असत. त्या राज्यांना एकत्र आणण्याचं काम माझ्या दृष्टीने आपल्यावर १५० वर्षे राज्य करणार्‍या इंग्लंडने केलं. भलेही इंग्लंड उत्तर आयर्लंडला आपल्यात सामावून घेऊ शकला नाही. भारताच्या विभाजनाला इंग्लंडला जबाबदार धरलं जात असलं तरीही त्यांनीच आपल्याला एकत्र केलं, ही वस्तुस्थिती आहे. इंग्रज आले आणि भारतीय म्हणून आम्हाला एक ओळख मिळाली, अन्यथा आम्ही सर्व आज कोणत्या ना कोणत्या छोट्यामोठ्या राजवटींचे नागरिक बनलो असतो. आजच्या युरोपमध्ये ३७ देश आहेत. त्यात जगातल्या सर्वांत छोट्या व्हॅटिकन सिटीपासून सर्वांत मोठ्या रशियाचा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात एकूण पाचशे पासष्ट संस्थाने होती. त्याचं रूपांतर आपण २८ राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांत केलं आहे.
ज्या अखंड भारताचा भागवत उल्लेख करतात अगदी त्याच देशांना एकत्र करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सार्क परिषदेची स्थापना १९८५ ला केली होती. मात्र त्याला हिंदुत्वाचा मुलामा दिलेला नव्हता. अगदी आता आता स्व. प्रणव मुखर्जी यांनी सार्क देशात रुपया हे चलन स्वीकारलं जावं, असं आग्रही प्रतिपादन केलं होतं. अर्थात ते होण्यास सर्वात मोठा अडसर असेल पाकिस्तान आणि अमेरिका . कारण सुमारे २०० कोटीहून जास्त लोकांचं चलन जर रुपया राहील तर त्यामुळे डॉलरचं अवमूल्यन होईल. पण हे सगळे प्रयत्न काँग्रेसच्या काळात झालेले आहेत.


मात्र संघाला अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद दूर ठेवून. भौगोलिकदृष्ट्या ’इंडो इराणीयन प्लेट’ बोलल्या जाणार्‍या क्षेत्रातील लोकांचे डीएनए समान आहेत. याला आम्ही हिंदुत्वाचे लक्षण समजतो, असं भागवत म्हणाले. पण हा नियम तर भारतीय मुस्लिमांनाही लागू आहे. पण मुस्लिम धर्माबद्दल संघ परिवारातील आकस सर्वश्रुत आहे. बहुसंख्य मुस्लिम बांधवांचे पूर्वज हिंदूच होते असे वारंवार सांगितले जाते, पण असे सांगणारी व्यक्ती धर्मांतर का झालं, त्याला जबाबदार आपलेच लोक कसे, हे सांगणं टाळतात.
अखंड भारताचे स्वप्न मुसलमानांच्या दृष्टीने जास्त आश्वासक आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता अखंड भारतातील मुसलमान जगात सर्वांत जास्त मोठा वर्ग बनतो. हे संघ परिवाराला चालण्यासारखे आहे? आज भारत, पाकिस्तान, बांगला देश मिळून सुमारे ६० कोटी मुस्लिम राहतात. त्यात मालदीव, अफगाणिस्तान सारख्या मुस्लिम देशांचा समावेश केल्यास ही बेरीज शंभर कोटींपर्यंत जाऊ शकते.


भारतातील हिंदूंची लोकसंख्या तितकीच आहे. शांतताप्रिय असल्याचा दावा करणार्‍या संघाने ज्या दंडुक्याची भाषा अखंड हिंदुस्थानसाठी वापरण्याचा इशारा दिला आहे तो दंडुका काश्मीरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी मोदींच्या आठ वर्षांत किंवा वाजपेयींच्या सहा वर्षांत का प्रयत्न केला नाही, हा एक प्रश्नच आहे. १९४७ पासून आजतागायत काश्मीर प्रश्नावर सुमारे लाखभर लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही आजाद काश्मीर भारतात विलीन करता आला नाही. अगदी मोदी सत्तेवर आल्यानंतरही. १० जिल्ह्यांत विभाजित असलेल्या सुमारे १३,००० चौ.कि.मी. भाग युनायटेड नेशन्सच्या आदेशानुसार आजही पाक शासित भाग आहे. या पार्श्वभूमीवर अखंड भारताला किती वेळ लागेल सांगता येत नाही. हिरोशिमा, नागासाकीनंतर अणुबॉम्बपासून मानवजातीला वाचवण्यात युनायटेड नेशन्स यशस्वी ठरला आहे. कारण तिसरा अणुबॉम्ब कोणी टाकला तर चौथाही टाकला जाईल आणि आठशे कोटीपैकी अर्धी मानवजात संपून जाईल. उर्वरित मानव कशा अवस्थेत जगेल याची कल्पनाही करवत नाही.


त्यामुळे अर्थात हातात दंडुके घेऊन अखंड भारत निर्माण करण्याचं स्वप्न युद्धाने यशस्वी होऊ शकत नाही. भागवतांची ही विधानं त्यांच्या आक्रमक अहंकाराला सुलभ अशी विधानं आहेत. अर्थात अशी वादग्रस्त विधानं करून केवळ त्यावर चर्चा घडवून आणायची, मिळाला तर निवडणुकीत फायदा घ्यायचा.


२०२४ लोकसभा निवडणुका आहेत तर २०२५ ला संघाची शताब्दी आहे. त्यातच एखाद्याने जर अखंड भारत या संकल्पनेला विरोध केला तर त्याला देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं, ही संघाची पद्धत. जसा राम मंदिराला विरोध करणार्‍यांना हिंदूविरोधी ठरवून मोकळं व्हायचं, तसलाच प्रकार! मिळालं तर आमच्यामुळे, नाही मिळाले तर देशद्रोही लोकांच्या कारवायांमुळे, असं सांगायला हिंदुत्ववादी तयार असतात. त्या प्रकारची पुनरावृत्ती ’अखंड भारत ’ इथे दिसत आहे. तूर्तास इतकेच!

  • जयंत माईणकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये