ताज्या बातम्यारणधुमाळी

INS विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी निल सोमय्यांनाही हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या नंतर आता त्यांचा मुलगा निल सोमय्या यांनादेखील मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. यासंदर्भात त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. बरोबरच, चौकशीसाठी निल यांनीं सहकार्य करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. काहीच दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनादेखील न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला होता.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केले होते. आरोपानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. मुंबई पोलिस दोघांचाही शोध घेत होते. दरम्यान दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला सत्र न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. नंतर किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आज निल सोमय्या यांना देखील उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही. त्याबाबतच पत्र राजभवनाकडून प्राप्त झालं आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये