अग्रलेखरणधुमाळी

लाज सोडलेले…

वेद पुराणांमधील धर्म राहू द्या पण माणुसकी चा एक धर्म असतो तो धर्म इतरांचा सन्मान शिकवतो आणि भावना जपण्याची जबाबदारी देखील शिकवतो ती देखील या राष्ट्रवादी काँग्रेसचे पायदळी तुडवली. कोट्यावधी लोकांच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय असलेले कन्यादान भारतीय संस्कृती त्याच्या रीतीभाती याची येथेच अवहेलना केली परंतु किरीट सोमय्याच्या बोलांची अशोभनीय टिंगल टवाळी करत माणुसकी देखील हरवून बसलात.

लाज सोडली की, कशाचा काहीही विधिनिषेध राहात नाही. मग या सभ्य, सुसंस्कृत समाजामध्ये आपण इतर समाजबांधवांप्रमाणे सभ्यतेने राहावे, सभ्यतेने बोलावे हीदेखील मर्यादा पाळण्याची आवश्यकता नसते. निर्लज माणसाला कुठल्याही चालीरीती-रीतीभाती पाळण्याची गरज वाटत नाही. जसे चिखलात लोळणारे डुकर घाणीने माखले तरी त्याला त्यातच आनंद वाटतो, असाच काहीसा निलाजरा प्रकार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांचा झाला आहे.

ब्राह्मण समाजावर टीका करण्याच्या द्वेष भावनेतून त्यांनी इस्लामपूरमध्ये जे काही वक्तव्य केले ते अखिल हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे. इतकेच नव्हे तर हिंदू समाजातील बहुजन समाज आणि ब्राह्मण यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा अप्रत्यक्षपणे प्रयत्न आहे. तथापि कन्यादानासारख्या एका पवित्र संस्कृतीचा गलिच्छ शब्दात त्यांनी उल्लेख केला. तोदेखील निषेधार्ह आहे. संस्कृत ऋचा, स्तोत्र यांचा द्वेषमूलक उल्लेख करीत असताना हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, एकश्लोकी रामायण यांची सरमिसळ करीत आपल्या अज्ञानाचे प्रकटीकरण मिटकरी यांनी केले. बहुजन समाजाला एका विशिष्ट वर्गाच्या द्वेष भावनेतून भरकटत न्यायचे आणि केवळ टाळ्या मिळवायच्या, असा हा विदुषकी प्रयोग काल त्यांनी केला. परंतु सर्व धर्माच्या गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या संस्कृतीचे ताणेबाणे उसवण्याचे पाप यामुळे आपल्या हातून होत आहे याचे गांभीर्यदेखील त्यांना राहिले नाही. त्याच व्यासपीठावर या विदुषकी वक्तव्यांना हसून हसून दाद देत कन्यादानासारख्या प्रथेची आणि परंपरेची थट्टा मांडणाऱ्या जयंत पाटील यांच्याही निलाजरेपणाचा प्रत्यय आला.

धनंजय मुंडे हे तर निव्वळ टुकार मनोवृत्तीचे नेते आहेत. त्यांच्या आजवरच्या चरित्रातून विवाह किंवा वैवाहिक मयांदा, त्याचे पावित्र्य याचे त्यांना काहीच सोयरसुतक नाही हे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमातील छद्मी हास्यानेदेखील ते पुन्हा दिसून आले. आज राष्ट्रवादीमध्ये दिलीप वळसे-पाटील आणि जयंतराव हे दोघेच सभ्य प्रतिमेचे मंत्री समजले जातात, परंतु जयंतरावांच्या आजच्या वागण्याने त्यांच्या सभ्यपणाचाही बुरखा फाटला. मिटकरी यांनी या कन्यादानाबद्दल भाष्य केले तो केवळ ब्राह्मण समाजाचा अपमान नव्हता, तर हिंदूंच्या विरोधामध्ये ही गरळ होती. कन्यादानासारखा एक पवित्र विधी त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने सादर केला. मुलीचा बाप एका भावनेने तिचा हात जावयाच्या हातात देतो आणि या •जीवनातील माझी इतिकर्तव्यता संपून अर्थ, काम, मोक्ष अशा सर्वांची आता ती तुझी सहकारी सहचारिणी आहे, तिची जबाबदारी तुझी आहे… म्हणून आपल्या कन्येचे पालकत्व तो त्या मुलाकडे देतो. ही कन्या मला वरदान म्हणून मिळालेली आहे.

परमेश्वराकडून मिळालेली आहे. ती मी तुला देत आहे म्हणून ‘इदं न मम’ या भावनेने ते ‘कन्यादान’ आहे. इतका सुंदर आणि पवित्र अर्थ असलेल्या या कन्यादानाची अत्यंत होन शब्दांत खिल्ली उडवत अस्तित्वात नसलेले शब्द-मंत्र म्हणत मिटकरी यांनी आपल्या दिवाळखोरी बुद्धिमत्तेचा प्रत्यय आणून दिला आहे. या सगळ्या गोष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेसला नेमके काय साध्य करायचे आहे? हे अनाकलनीय आहे. तुम्हाला ब्राह्मण विरोधी पक्ष तयार करायचा आहे का? हिंदू विरोधी पक्ष तयार करायचा आहे का? यातून तुम्हाला खरोखरच सत्तेच्या सोपानापर्यंतची मते मिळणार आहेत का? अशी प्रतिमा करून नेमके तुम्ही साधणार काय आहात? गेल्या काही दिवसांत शरद पवार यांच्यावरील होत असलेली टीका पाहता खरंतर या पक्षाने खूप गांभीयनि आपल्या भूमिका मांडण्याची गरज आहे. कुठल्याही जातीच्या धर्माच्या द्वेषातून आपण उभे राहू शकत नाही इतकी साधी शिकवणसुद्धा शरद पवार यांच्यासारख्या सात दशके राजकारण करणाऱ्या व्यक्तीला समजली नाही का? राष्ट्रवादीमध्येच ही द्वेषमूलक धारणा रुजत आहे आणि तेच धोरण ठसत आहे का? ज्या इस्लामपूरमध्ये हे घडले तेथून ते अमेरिकेच्या शिकागोपर्यंत होत असलेली कन्यादाने ही याच संस्कृत ऋचांनी आणि वेदांमध्ये दिलेल्या श्लोकांनी होत आहेत.

व्यासपीठावरील अनेकांनी हे कन्यादान केले असेल. आपण कोणाची अवहेलना करीत आहोत? का स्वतःचीच चेष्टा करीत आहोत ? हेदेखील भान आता या राष्ट्रवादीच्या मंडळींना राहिले नाही.. कुठल्याही कार्याला धर्माधिष्ठान लागते असे म्हणतात. त्याशिवाय ते कार्य उभे राहात नाही. वेद-पुराणांमधील धर्म राहू द्या, पण माणुसकीचा एक धर्म असतो, तो धर्म इतरांचा सन्मान शिकवतो आणि भावना जपण्याची जबाबदारी देखील शिकवतो. तीदेखील या राष्ट्रवादी काँग्रेसने पायदळी तुडवली. कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय असलेले कन्यादान भारतीय संस्कृती, त्याच्या रीतीभाती याची येथेच अवहेलना केली. परंतु किरीट सोमय्यांच्या बोलांची अशोभनीय टिंगलटवाळी करीत माणुसकीदेखील हरवून बसलात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये