’पुणे द ब्रँड’साठी कोथरूड महोत्सव मोलाचा टप्पा

पुणे : पुणे हे निर्विवाद सांस्कृतिक राजधानी आहे आणि या राजधानीचा मूल्याधिष्ठित बाज कायम ठेवण्यात आजवर याच भूमीतील साहित्यिकांनी कलाकारांनी देणगीदारांनी आणि राज्यकर्त्यांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. गेल्या पाच दशकांपासून ज्याप्रमाणे पुण्याला उभारत्या सांस्कृतिक वैभवाचा वारसा लाभला आहे त्यामध्ये मोहन धारिया, सुरेश कलमाडी, विठ्ठलराव गाडगीळ, सतीश देसाई, अनिल शिरोळे यांच्यासारख्या अनेकांनी आपले योगदान दिले आहे.
नवीन पिढीमधील राज्यकर्त्यांमध्ये देखील हा बाज कायम टिकविण्याची परंपरा जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा होत असल्याचे दिसते. याच अनुषंगाने नुकताच पार पडलेला कोथरूड महोत्सव हा एक मोलाचा टप्पा समजला जाईल. महापौरपदाची कारकीर्द गाजवलेले मुरलीधर मोहोळ हे ’कोथरूड महोत्सव’ हा एक अत्यंत दर्जात्मक आणि पुण्याच्या संस्कृतीला उंचीवर नेणारा कार्यक्रम गेली काही वर्षे घडवून आणत आहेत. या महोत्सवास कोथरूड सारख्या परिसराचे नाव दिल्यामुळे यास संकुचितपणा येईल असे वाटले होते. परंतु तो ग्रह मोडीत काढत मोहोळ यांनी संपूर्ण पुणेकरांना यामध्ये सहभागी करून घेतले आणि कोथरूड संपूर्ण पुण्याचे मॉनिटरिंग कशा पद्धतीने करू शकते हे देखील दाखविण्याचा निर्विवाद प्रयत्न केला.
ज्या पद्धतीने मुरलीधर मनोहोल यांनी राजकीय लीडरशीप घेतली आहे त्याचप्रमाणे पुण्याची संस्कृती पुढे घेऊन जाण्याकरता देखील आपण नेतृत्व देऊ शकतो ही चुणूक यानिमित्ताने त्यांनी दाखविली. पुण्यामध्ये झालेले आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल, पुणे महोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, वसंत व्याख्यानमाला, बालेवाडी मधील आंतरराष्ट्रीय क्रीडा सामने या सर्व माध्यमातून येथील राज्यकर्त्यांनी कायमच पुढाकार घेतला आणि पुण्याला महाराष्ट्राच्या पटलावर अधोरेखित केले. हाच वारसा पुढे घेऊन जात असताना मुरलीधर मोहोळ यांनी तीन दिवस जो कार्यक्रम केला त्यातून पुणेकरांचे बौद्धिक भूक तर भागवली गेली परंतु पुन्हा एकदा ’वैभवांकित पुणे’ पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही उचलू शकतो हा देखील विश्वास त्यांच्यामधून दिसून आला.