‘पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयार केलं’; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नवनीत राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील आपण इमारतीमधून बाहेर पडून मातोश्रीला जाणार आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणारच, असा निश्चय नवनीत राणा यांनी बोलून दाखवला आहे. यासंदर्भात आपल्या घराबाहेर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या “आम्ही ९ वाजेची वेळ दिली होती. पण आमच्या दरवाज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा उभा आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल मातोश्रीवर बैठक घेऊन पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यात पोलीस विभागाला बॅरिकेड्स हटवायला सांगितले. ते बॅरिकेड्स क्रॉस करून आमच्या गेटच्या आतपर्यंत शिवसेना कार्यकर्ते आले. आमच्यासोबत इथे इतरही १० कुटुंब राहतात. लोक आत शिरेपर्यंत पोलीस काय करत होते? कुणाच्या आदेशांवर पोलीस विभाग काम करतोय?”,असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“काल पूर्ण कुटुंबासह मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर आले. शिवसेना कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी त्यांनी तयार केलं. काल रात्रीपर्यंत बॅरिकेड्सला कुणी शिवसेना कार्यकर्ते स्पर्श देखील करू शकत नव्हते. आज ते कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून गेटच्या आतपर्यंत कसे येतात? हा माझा प्रश्न आहे”, असंही राणा म्हणाल्या.
“एक तर पोलीस त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या इच्छेनुसार काम करत आहेत. शिवसेना खुलेआम गुंडगिरी करत आहे. मी इथून बाहेर जाणार आणि मातोश्रीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच. आम्हाला कुणीही अडवू शकत नाही. तुमच्याकडे जरूर पोलीस प्रशासन असेल, पण आमच्या लोकांनीही आम्हाला ताकद दिली आहे. तुम्ही तुमच्या पिढीच्या भरवश्यावर खात आहात. आम्ही स्वत: आमचं भविष्य घडवून इथपर्यंत आलो आहोत. बजरंगबलीची ताकद आमच्यासोबत आहे. कुणीही आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही हे पोलीस विभागाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सांगणं आहे”, असं देखील नवनीत राणा म्हणाल्या.
“जे मुख्यमंत्री दोन-अडीच वर्षांपासून कामावरच गेले नाहीत. बिनकामी पूर्ण पगारी असे आपले मुख्यमंत्री आहेत. काम काहीच केलेलं नाही, पण मुख्यमंत्रीपदाचा पूर्ण पगार त्यांनी घेतला”, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.