१९ वी पुणे पुस्तक जत्रा गुरुवारपासून

पुस्तक जत्रामधील आकर्षक व लक्षणीय विभाग
केंद्र व राज्य सरकारची प्रकाशने, भारतीय जनगणनेवरील स्कॉलिस्टिक इंडियाची सर्व शैक्षणिक पुस्तके, राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद अजंठा प्रकाशनतर्फे बुद्धिस्ट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके, आयआरएच प्रेस कं. लिमिटेड जपान यांची हॅपी सायन्स, सेल्फ हेल्प, आध्यात्मिक, व्यवस्थापन वैयक्तिक विकास व काल्पनिक कथा, तर नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडियातर्फे भारतीय चित्रपटांचा १०० वर्षांचा इतिहास आणि भारताच्या विविध संस्कृतींच्या वारशाचे जतन आणि संवर्धन करणार्या संगीत नाटक अॅकॅडमी, मार्गदर्शक, जुनी व दुर्मीळ ऐतिहासिक ऐश्वर्य दाखविणारे, पराक्रमांवर आधारित, ब्रेल लिपीतील पुस्तके, शैक्षणिक साहित्य, आघाडीची वृत्तपत्रे, अशा अनेक प्रकारच्या पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश आहे.
पुणे : पश्चिम भारतातील सर्वांत मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रा दरवर्षी भरविली जाते. या मालिकेतील १९ वे प्रदर्शन २८ एप्रिल ते १ मे २०२२ दरम्यान क्रिएटी सिटी मॉल, येरवडा पुणे येथे भरविण्यात येणार आहे.२८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते पुणे बुक फेअरचे उद्घाटन होणार आहे.
समारंभास डॉ. अशोक कामत प्रमुख पाहुणे म्हणून आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाहक दीपक करंदीकर, क्रिएटी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश, आकाशवाणीचे प्रोग्राम डायरेक्टर इंद्रजीत बागेल, येरवडा परिसरातील लोकनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि माजी आमदार रामभाऊ मोझे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
या प्रदर्शनात देशातील नामवंत पुस्तक विक्रेते व वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, माहिती, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत आणि इतर भाषेतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
२८ एप्रिल ते १ मे दरम्यान क्रिएटी सिटी मॉल, येरवडा, हे प्रदर्शन रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्य्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा पुणे बुक फेअरमध्ये दोन साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.२९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता Authors Meet (इंग्रजी लेखकांचा मेळावा), सायं. ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद विश्रांतवाडी शाखा आयोजित प्रसिद्ध गझलकार कवी दीपक करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. माधव राजगुरू व उद्धव कानडे या ज्येष्ठ कवीच्या उपस्थितीत निमंत्रित कवी संमेलन होणार आहे. १ मे रोजी सकाळी ११ वाजता लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात ज्येष्ठ प्रकाशक सु. वा. जोशी, ज्येष्ठ संपादक विनया खडपेकर, तरुण संपादक व लेखक मनोहर सोनवणे, एकपात्री कलाकार बंडा जोशी, बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक दीपक करंदीकर हे साहित्य-व्यवहारविषयक संवाद साधणार आहेत.