‘या’ प्रकारणात ईडीचा मोर्चा महाराष्ट्र, गुजरातकडे…

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बॅंकींग घोटाळा म्हणून ओळखला जाणारा (एबीजी) शिपयार्ड बॅंक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाची आता ईडीने चौकशी सुरु केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि त्याचे संचालक ऋषी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांच्या संबंधित मालमत्तेवर ईडीने छापे टाकायला सुरुवात केली आहे. २२ हजार कोटींहून अधिक किंमतीचा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचे मानले जात आहे. (एबीजी) शिपयार्ड कंपनीने २८ बँकांकडून कर्ज घेतले होते. या घोटाळ्याबाबत सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे जहाजांची निर्मिती आणि दुरुस्तीचे काम करते. एबीजी शिपयार्ड लिमिटेडची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली असून, आतापर्यंत या कंपनीने १६५ हून अधिक जहाजांची निर्मिती केली आहे. मात्र, एकेकाळची भारतातील सर्वात मोठी खाजगी शिपयार्ड कंपनी आता कर्जबाजारी झाली आहे. या कंपनीला २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये (एसबीआय) चे एक्सपोजर २४६८.५१ कोटी इतके होते.
आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर प्रकार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भांडवल वळवणे, अनियमितता, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि बँकांकडून घेतलेले पैसे मुळ कारणासाठी न वापरता इतर कारणांसाठी वापरणे यांचा समावेश आहे. ऑडिटमध्ये हे उघड झाले आहे की, २०१२ आणि २०१७ दरम्यान आरोपींनी निधीचा गैरवापर आणि अवैध गोष्टी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.