कोल्हटकर स्मृती द्विपात्री स्पर्धांचे पुण्यात आयोजन
महाराष्ट्र, निळू फुले कला अकादमीतर्फे उपक्रम
पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त ‘चित्तरंजन कोल्हटकर स्मृती राज्यस्तरीय मराठी द्विपात्री सादरीकरण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असून, स्पर्धा दि. १६ ते २० मे २०२२ या कालावधीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या तीन संघांना अनुक्रमे रु. ५०००/-, रु. ३०००/- आणि रु. २०००/- रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे गुणांकन केवळ अभिनयावर होणार आहे. स्पर्धकांनी प्रवेशनिश्चिती दि. १० मे पर्यंत करायची आहे, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष सुरेश देशमुख, चित्तरंजन कोल्हटकर यांचे पुत्र आनंद कोल्हटकर, कन्या उज्ज्वला केळकर, तारका करमरकर, वर्षा आनंद, आशुतोष नर्लेकर उपस्थित होते.
वैयक्तिक गटात स्त्री-पुरुष यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक (स्मृती चिन्ह) दिले जाणार आहे. या शिवाय स्पर्धेसाठी लेखन केलेल्या नवीन संहितेस रु. ७०० रोख, स्मृतीचिन्ह आणि रु. ५०० रोख, स्मृतीचिन्ह असे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकास पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेचे लॉटस् दि. १४ मे रोजी काढण्यात येणार आहेत. स्पर्धेचा वयोगट १९ ते ६५ असा आहे.