आम्ही म्हणजेच हिंदू असा काही जणांचा गैरसमज

देवेंद्र फडणवीस
यांची सरकारवर टीका
मुंबई : भाजपने सुरू केलेल्या पोलखोल सभेच्या समारोपावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर सभा घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये अयोध्या बाबरी मशिदीचा ढाचा तोडण्याबाबत, भाजपनेत्यांवर होणारे हल्ले यावरून जोरदार घणाघात फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.
काही लोकांचा गैरसमज आहे, की ते म्हणजेच महाराष्ट्र आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, की लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे १८ पगड जातीच्या १२ कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे, तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, बाबरी मशिदीवरून फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हटले आहे, की ते (उद्धव ठाकरे) काय म्हणाले परवा, म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. कोणीतरी प्रश्न केला, मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमले नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. तो बाबरी ढाचा, मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिराकरिता बदायूच्या तुरुंगात मी १८ दिवस घालवले, असे देवेंद्र फडणवीस बुस्टर सभेच्या वेळी म्हणाले.