‘साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्यानं…’;अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आपल्या खास शैलीमध्ये निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी राज ठाकरे यांनी नेमकं काय काम महाराष्ट्रात केलंय असा सवाल उपस्थित करत त्यांच्या कामाचा पाढा वाचून दाखवला. सोमवारी नाशिकमधील येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभाच्या वेळी बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“मित्रांनो आज आपण काय बघतोय. कशा करता लोकांना आता भोंगे आठवले. कशा करता सभा घेतल्या जात आहेत. आता कुठल्या निवडणुका आहेत का? लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरु आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेऊन गेले ५५ वर्ष काम करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही जातीयवादी म्हणता,” असा सवाल अजित पवारांनी आपल्या भाषणामधून उपस्थित केला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापिठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या वेळेस मी आमदार होतो. नागपूरला रात्री देवगिरी बंगल्यावर आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आमच्या देखत काही आमदारांनी सांगितलं तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. पवारांनी भाषणात सांगितलं की शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मी पुरोगामी विचारांचं चाक उलटं फिरु देणार नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं.”
“सत्तेसाठी ते कधीच हापहापलेले नव्हते. चार वेळा मुख्यमंत्री तर दहा वर्षे केंद्रीय कृषीमंत्री होते. काही वेगळा प्रसंग घडला तर देशाला एकत्र करण्याचं काम पवारांनी केलं हा इतिहास नाकारु शकत नाही,” असंही ते म्हणाले. राज ठाकरेंवर निशाणा साधताना, “त्याचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवारांचं राजकारणामधील आयुष्य आहे. हे काय गप्पा मारताय,” असा टोला अजित पवारांनी लगावला. तसंच पुढे बोलताना, यांना पण काही काळ १९९५-९९ जेव्हा भाजपा शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांना कामं करता आली असती ना, असंही अजित पवार म्हणाले.
“ठिकं आहे बाबा, तुम्ही स्वत: नाही केलं. दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली? कधी शब्द खर्ची केला? काही व्हीजन दाखवलं अहो साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने. दूध सोसायटी नाही, टरबूज-खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, महसूल सोसायटी नाही या सोसायट्या त्यांना कळतच नसतील. काय सोसायट्या सोसायट्या. नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला,” अशा आपल्या खास शैलीमध्ये अजित पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.