युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व देणार
प्रकाशकुमार मनोरे यांचे मत
इंदापूर : इंदापूर शहरात युवकांकडून चांगले काम केले जात आहे. त्यांच्या कामाची दखल राज्याच्या नेहरू युवा केंद्राने घेतले आहे. इंदापूर तालुक्यातील युवकांच्या सामाजिक कामाला गती प्राप्त होण्यासाठी, युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र व गोवा राज्याचे नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाशकुमार मनोरे यांनी दिली.
इंदापूर येथे नेहरू युवा केंद्र मुंबई, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांच्या वतीने शहा सांस्कृतिक भवन मध्ये शुक्रवारी रोजी नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा हेल्थ क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोरे बोलत होते.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे प्रमुख यशवंत मानखेडकर, अंकिता शहा, मुकुंद शहा, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, वैशाली शहा, कराटे प्रशिक्षक दत्तात्रय व्यवहारे, राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व योग शिक्षक शरद झोळ, नेहरू युवा केंद्राचे मार्गदर्शक डॉ. संदेश शहा, तालुका प्रतिनिधी विकास कणसे, संदीप बारवकर, तानाजी मारकड व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.