निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध

महापालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. प्रारुप रचनेमध्ये केवळ चार बदल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड : तब्बल ५ हजार ६८४ हरकती व सूचनांचा पाऊस पडल्यानंतरही मोजके बदल करण्यात आले असून बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे इच्छुकांना नेमक्या कोणत्या परिसरात निवडणूक लढवायची आहे, हे स्पष्ट झाले आहे, तर चर्होली, चिखली, इंद्रायणीनगर, प्रेमलोक पार्क या प्रभागात किरकोळ फेरबदल करण्यात आलाय.
महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभागचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. एकूण १३९ नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्या आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ५ हजार ६८४ हरकती व सूचनांवर २५ फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्य सरकारने विधिमंडळात कायदा पारित करून प्रभागरचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले.
मात्र, या कायद्याच्याविरोधात १३ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकांवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकार्यांनी प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे.
‘या’ आठ प्रभागांत बदल :
प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (पूर्वीची लोकसंख्या ३३ हजार ६५३ होती, आता ३२ हजार १६१) असणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ – बोर्हाडेवाडी, जाधववाडी (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ६७१ होती, आता ३६ हजार ७१८) असणार आहे.
प्रभाग क्रमांक ५ – चर्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (पूर्वी लोकसंख्या ३९ हजार ९७० होती. आता ३४ हजार ८१६) असणार आहे.
प्रभाग क्रमांक ७ – सँडविक कॉलनी, रामनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ९७ होती. आता ४२ हजार २५१) असणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ – गवळी माथा, बालाजीनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ३६० होती. आता ३८ हजार ३१३) असणार आहे.
प्रभाग क्रमांक १२ – घरकुल, नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती (पूर्वी लोकसंख्या ३४ हजार ४१८ होती. आता ३५ हजार ९१०) असणार आहे.
प्रभाग क्रमांक २६ – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ४२० होती. आता ३९ हजार ६००) असणार आहे.
प्रभाग क्रमांक २७ – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह (पूर्वी लोकसंख्या ३८ हजार ७२७ होती. आता ३६ हजार ५४७) असणार आहे.
निवडणूक विभाहाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, आयोगाने अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. आता आरक्षण सोडत, मतदारयादी विभाजनाबाबात आयोगाकडून सूचना येतील. त्यानुसार पुढील कार्यक्रम राबविला जाईल.
राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळताच महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. प्रारुप आराखड्यामध्ये प्रभाग क्रमांक २, १२, ३, ५, ११, ७, २६ आणि २७ मध्ये बदल करण्यात आले आहेत. बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रारुप आराखडा हा राष्ट्रवादीसाठी तारक ठरणार असल्याच्या शक्यता सुरुवातीपासूनच वर्तविल्या जात आहेत. मात्र हजारोंच्या संख्येने हरकती व सूचना आल्यामुळे त्यामध्ये मोठा बदल होईल, अशी आशा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना होती. ही अपेक्षा आजच्या अंतिम आराखड्यामुळे फोल ठरली आहे.