निर्यात बंदीमुळे युरोपात गव्हाच्या किंमती गगनाला भिडल्या- वाचा सविस्तर

पॅरिस : दोन दिवसांपूर्वी भारत सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले. आज भारताच्या या निर्णयाचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवू लागला आहे. निर्यात बंदीच्या निर्णयानंतर गव्हाच्या किमती विक्रमी उच्चाकांवर पोहचल्या असून, युरोपीयन बाजारात गव्हच्या किमती 435 युरो (453 युरो) प्रति टनावर गेल्या आहेत. त्यामुळे आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळं महागाईनं त्रस्त नागरिकांना आता आणखीन झळ बसणार आहे.
दरम्यान, देशात अन्न-धान्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी ही निर्यात रोखण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं G7 देशांनी भारताच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. याला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्वीट करून उत्तर दिलं आहे. पुरी म्हणाले की, भारतात गहू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारताच्या अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित करून अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित ठेवणं आणि बाजारातील साठेबाजीचा प्रश्न सोडविण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेजारी देश आणि संकटात असलेल्या देशांच्या अन्न-धान्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी भारत समर्थ आहे, असंही हरदीपसिंग पुरी यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.