क्रीडापुणे

एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद; पहिली ‘सिल्व्हर करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

पुणे : सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या ‘सिल्व्हर करंडक’ अजिंक्यपद १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा २ गडी आणि ४ चेंडू राखून उत्कंठावर्धक विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदान, चिखली येथे झालेल्या स्पर्धेत नाणेफेक जिंकून सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी निवडली व २५ षटकात ६ गडी गमावून १४५ धावांचे आव्हान उभे केले. प्रज्वल पवार याने ५७ धावांची खेळी केली. रुद्र किर्दत (३७) आणि अर्णेश रॉय (२६) यांनीही संघाच्या डावाला आकार दिला.

अंतिम फेरी संक्षिप्त धावफलक ः सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी ः २५ षटकांत ६ गडी बाद १४५ धावा (प्रज्वल पवार ५७ (५१, ५ चौकार, १ षटकार), रुद्र किर्दत ३७, अर्णेश रॉय २६, क्रिश पाटील १-१८) पराभूत वि. एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी ः २४.२ षटकांत ८ गडी बाद १४८ धावा (गुरुवेश जगताप ४७ (३७, ५ चौकार, १ षटकार), अविनाश भारद्वाज नाबाद ३७ (१९, २ चौकार, २ षटकार), विराज खानावकर १७, शौमिक हजारनीस ३-१२);
सामनावीर ः अविनाश भारद्वाज

आव्हानाचा पाठलाग करताना एजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने सावध सुरुवात केली. गुरुवेश जगताप (४७) आणि विराज खानावकर (१७) या दोघांनी संघाचा डाव सावरून संघाला विजयाच्या समीप नेले. अविनाश भारद्वाजने नाबाद ३७ धावांची खेळी करून मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाचा विजय २४.२ षटकांत संपादन केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजीपटू श्रीकांत जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सिल्व्हर ग्रुपचे संचालक किरण सावंत, सतीश बग, अशोक बग, सोमनाथ सस्ते, मुख्य क्रिकेट प्रशिक्षक राजू कोतवाल उपस्थित होते. राजू कोतवाल यांनी प्रास्ताविक केले. कैलास डांगे यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला एजे स्पोर्ट्स संघाला आणि उपविजेत्या सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक व मेडल्स देण्यात आली. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

अमन सिंग (डॉमनिक सीए) याला मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू; इशान मानकर (सिल्व्हर अ‍ॅकॅडमी) याला सर्वोत्कृष्ट फलंदाज, तसेच आयुष मेहता (एजे स्पोर्ट्स) याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी पारितोषिके देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये