नगरच्या ‘नातवानं जन्माचं पांग फेडलं’; समाजानं आदर्श घ्यावा अशी घटना
अहमदनगर : जिल्ह्यातील राहाता येथे समाजानं आदर्श घ्यावा अशीच एक भावनांचे बंध उलगडणारी घटना घडली आहे. म्हटलं जात की, आजोबा नातवाचे पहिले मित्र असतात आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र असतो’. अगदी या वाक्याला साजेल अशी घटना घडली आहे. ७२ वर्षाच्या आजोबांना २२ वर्षाच्या नातवानं ६० टक्के लिव्हर देवून मोठ्या आजारातून बाहेर काढलं आहे. मानवी नाते हे भावभावनांनी भरले आहे. ते अमूल्य असून कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही.
दरम्यान, राहाता येथील शेतकरी सखाहरी सदाफळ (सखानाना) यांना डिसेंबर २०२१ मध्ये पायांना आणि पोटाला सूज येण्यास सुरुवात झाली. विविध चाचण्या केल्यानंतर सखानाना यांचे लिव्हर खराब झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कोणतंही व्यसन नसताना लिव्हरच्या आजारानं गाठल्यानं त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयातमध्ये दाखल केले. दाता शोधून लिव्हर प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
यावेळी, नातू आदित्य सुनिल सदाफळ याने आजोबांसाठी लिव्हर दान करण्याचे ठरविले. आदित्य दाता होण्यास तयार झाला. नातवाचा आणि आजोबांचा रक्तगट जुळाला. आठ दिवसांपूर्वी त्याच्या लिव्हरचा साठ टक्के भाग काढण्यात आला. शस्त्रक्रिया करत आजोबाचे लिव्हर काढून टाकण्यात आले. त्याजागी नातवाने दिलेल्या लिव्हरच्या भागाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. आठ दिवसांच्या उपचारानंतर नातू आदित्य घरी परतला आहे. आपल्या आजोबांना चिरंजीवी भेट देणारा नातू म्हणून त्याचे कौतूक केले जात आहे. आजच्या मर्यादित नाते जपणाऱ्या युगात आदित्यने समाजातील असंख्य नातवांसाठी एक आदर्श ठेवला आहे.