महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई | Rain With Thunder In Maharashtra – केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर आता मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. त्याचबरोबर वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज देखील चुकला आहे. आता महाराष्ट्रात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
आज उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. तसंच संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत या जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.