धक्कादायक! कुलर ठरला काळ, तरूणी फरशी पुसत होती अन्…
भंडारा | आजकाल मृत्यू कधी, कसा आणि कुठे येईल हे काही सांगता येत नाही. यामध्ये अनेकदा आपण घरातली कामं करत असताना अशा काही घटना घडतात ज्या जीवावर बेततात. घरातील इलेक्ट्रिक वस्तूच अनेकदा मृत्यूचं कारण ठरताना दिसतात. सध्या अशीच एक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. या घटनेत फरशी साफ करत असताना एका मुलीला कुलरचा धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे घडली आहे. सुचिता धनपाल चौधरी असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणीचं नाव असून तिचं वय अवघं २२ वर्षे होतं. सकाळी ती आपल्या घरात साफसफाईचं काम करत असताना ही घटना घडली. घरात लावलेल्या कुलरजवळची जागा साफ करत असताना तिचा कुलरला स्पर्श झाला. परंतु, या कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का लागून ती खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली.
सुचिता घरात कोसळल्याचं कळताच घरात एकच गोंधळ उडाला. यानंतर लगेचच तिला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच लाखांदूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.