माऊलींच्या स्वागतासाठी सासवडमधील शितोळे सरकारांचा तंबु एक दिवस अगोदरच सज्ज
सासवड – Pune Rural News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम संत सोपानदेव यांच्या सासवड भूमीत दोन दिवसांसाठी स्थिरावणार आहे. दि २४ व २५ जुन दिवशी पालखी सासवड मध्ये येत असून पालखीच्या वास्तव्यासाठी परंपरेनुसार आज बेळगाव येथील अंकलीच्या श्रीमंत शितोळे सरकार यांचा तंबु एक दिवस अगोदर पासूनच सज्ज झाला आहे.
पालखीचा या तंबुतील पहिलाच मुक्काम असतो. २८ फूट लांब १८ फूट रुंद तर १४ फूट उंच अशा स्वरूपातील हा तंबु अष्टकोनी असून त्यात एलईडी लाईट व सीसीटिव्ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शितोळे यांचे प्रतिनिधी हेमंत निखळ यांनी दिली आहे. तंबूच्या खांबांना झळाळी देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे तंबुचे कापड पाणी व अग्निरोधक आहे.
तंबुसाठी कोणत्याच नटबोल्टचा वापर केला नसून अर्ध्या तासात तो उभारता येतो व काढताही येतो असेही निखळ यांनी सांगितले. कर्नाटक – बेळगाव येथील अंकलीच्या उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात सुमारे २०० वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याचप्रमाणे माऊलींच्या अश्वाचा मान आहे. आषाढ वारीत माऊलींसाठी रोजच्या पहाटेच्या नैवैद्याचा मान देखील शितोळे सरकारांचा असुंन तो फक्त पुराणपोळीचाच असतो अशी माहिती हेमंत निखळ यांनी दिली