कोड आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यकच…

पुणे : कोड या आजाराबाबत समाजात जागृततेऐवजी गैरसमजच अधिक आहेत. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २५ जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो.
कोड आजार व कोड असलेल्या लोकांबाबत समाजात जागृतीऐवजी समज-गैरसमजच अधिक आहेत. याबाबत जनजागृतीसाठी पुण्यातील त्वचारोग संघटनेच्या वतीने (भारतीय असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट वेनेरिओलॉजिस्ट लेप्रोलॉजिस्ट) कोडग्रस्त गरजू रुग्णांना सर्जिकल उपचार देण्याची योजना आखली आहे. या योजनेमुळे शक्य त्यांना पूर्णपणे मोफत आणि शस्त्रक्रियेच्या स्वरूपानुसार ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. कोड आजारावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
मानसिक ताणामुळे या विकाराला सुरुवात होते. अन्य विकारांपेक्षा कोडाचा मानसिक ताण जास्त असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचे डाग दिसल्यास नैराश्यातून न्यूनगंड येतो. कोडावर अजून निश्चित इलाज नाही. औषधोपचारानंतर हे डाग नाहीसे होतात.
-डॉ. प्रद्युम्न वैद्य, त्वचारोगतज्ज्ञ
त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे डाग’ असे म्हणतात. हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात. मात्र स्थान निश्चित नसते. कोणत्याही रंगाच्या व वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकते. त्वचेतील रंग कमी होतो व शरीरावर कुठेही पांढरे किंवा पांढरटसर चट्टे उमटतात. आपण भारतीय सावळ्या रंग गटात येत असल्याने त्वचेवरील कोणताही पांढरा चट्टा उठून दिसतो. थोडासा मानसिक आजाराकडे झुकणारा हा आजार आहे. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचे डाग दिसल्यास नैराष्यात न्यूनगंड येतो, यामुळे अशा रुग्णांना जनजागृतीची आवश्यक आहे. परंतु औषध, शस्त्रक्रिया उपचाराने रोगावर मात करता येऊ शकते.