ज्योतीताईंच्या ‘जीवनगौरव’ने वाढणार महोत्सवाची उंची!

बालगंधर्व परिवाराच्या वतीने देण्यात येणारा हा जीवनगौरव माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान आहे. कलाकारांनी चालविलेल्या या थिएटर चळवळीमध्ये माझी दखल घेऊन हा मान मिळत असताना तो बालगंधर्वांच्या नावांशी जोडला जात आहे, हीच मानाची गोष्ट आहे. या पुरस्काराने मी भारावले आहे. आजपर्यंत केलेल्या भूमिकेच्या सेवेचे सार्थक झाले.
— ज्योतीताई चांदेकर
(जेष्ठ अभिनेत्री)
बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज ज्येष्ठ सिने व नाट्यअभिनेत्या श्रीमती ज्योतीताई चांदेकर यांचा गौरव होत आहे या गौरवाच्या माध्यमातून या चळवळीने खर्या अर्थाने एका कसदार आणि रंगभूमीवर प्रेम करणार्या निष्ठावंत रसिकाला न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्योतीताईंनी चार दशके आपल्या अभिनयातून एका पिढीचे मनोरंजनच केले नाही तर संस्कारातून भरण-पोषणदेखील केले. त्यांचे रंगभूमीवरील अस्तित्व हे या मराठी रंगभूमीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे आणि ही कधीही न संपणारे स्वप्न आहे. त्यांच्या अभिनयाचा बाज आणि त्याचा सुगंध हा चंद्र-सूर्य असेल तोपर्यंत त्या मराठी रंगभूमीच्या क्षितिजावर दरवळत राहणार, यात संदेह नाही. बालगंधर्व रंगमंदिर ५४ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे.
या महोत्सवात जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाची एक प्रकारे उंची वाढणार आहे. ज्योती चांदेकर नावाची अजोड अभिनेत्री मराठी रंगभूमीवर आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्या चांदेकर यांना अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. यानिमित्ताने, गेल्या दोन-तीन वर्षांत ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट,’ ‘सुखान्त’ या चित्रपटांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या या गुणाढ्य अभिनेत्रीच्या कारकिर्दीला उजाळा मिळाला.
दिग्दर्शक अनंत ओक यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकासाठी त्यांना निवडलं. पुढे बाबूराव गोखलेंच्या ‘करायला गेलो एक’, ‘वर्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ अशा नाटकांतून कामं केली. पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदे’ने सादर केलेल्या ‘बेईमान’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. पणशीकरांसह सतीश दुभाषी प्रमुख भूमिकेत होते. यानिमित्ताने मुंबईच्या रंगभूमीवर त्यांचं आगमन झालं. तसेच ‘रखेली,’ ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ ही नाटकं खूप चालली.
मात्र, त्यांचा बोलबाला झाला तो ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकामुळे. देखणं ठसठशीत व्यक्तिमत्त्व, भेदक डोळे आणि करारी आवाज यांची किमया या नाटकाने आणि पुढे ‘माझं घर’ व ‘मित्र’ या सुयोग संस्थेच्या नाटकांनी प्रेक्षकांना दाखवली. त्या रंगमंचावर असल्या की प्रेक्षकाला एका शब्दाने वा हालचालीनेही बांधून टाकत. थिएटर अॅकॅडमीने ‘हू इज आफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ हे नाटक ‘उत्तररात्र’ नावाने मराठीत सादर केलं, तेव्हा त्यातली पडद्यावर एलिझाबेथ टेलरने गाजवलेली मार्थाची गुंतागुंतीची भूमिका ज्योतींनी अशी अफाट रंगवली, की सगळेच थक्क झाले. अशा महान ज्येष्ठ अभिनेत्री असणार्या ज्योतीताई चांदेकर यांना महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.