कलाकारांनी जोपासलेली चळवळ विश्वस्तरावर नेऊ- मेघराज राजेभोसले

मराठी रंगभूमी चित्रपट कलावंतांनी निर्व्याज प्रेमातून जोपासलेली बालगंधर्व चळवळ ही निरंतर ठेवून याला विश्वस्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ, असा आशावाद चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा बालगंधर्व परिवाराचे प्रमुख मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केला. दैनिक राष्ट्रसंचारच्या विशेष संवादात ते बोलत होते. बालगंधर्व वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मेघराज राजेभोसले यांनी राष्ट्रसंचारशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या चळवळीचा इतिहास, सद्यःस्थिती आणि भविष्यकालीन योजनांवर प्रकाशझोत टाकला. त्यांच्याशी साधलेला हा संवाद त्यांच्याच शब्दांत.
खरेतर जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या थिएटरचा वर्धापन दिन इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही. बालगंधर्व रंगमंदिर हे एकमेव रंगमंदिर आहे जिथे लोक या रंगमंदिराशी भावनिक पातालीवर जोडलेलं आहेत. त्याचा वर्धापन दिन त्यांना एखाद्या सणा सारखा वाटतो. “
— मेघराज राजे भोसले
अध्यक्ष चित्रपट महामंडळ
बालगंधर्व परिवाराची स्थापना ही बालगंधर्व रंगमंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनापासून झाली. २६ जूनला वर्धापनदिन साजरा केला जातो. बालगंधर्व रंगमंदिरावर अनेक कलाकार अवलंबून असतात. प्रत्येक वर्षी आपण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करीत असतो आणि जूनमध्ये आपण त्याचा वर्धापनदिन साजरा करतो. बालगंधर्व रंगमंदिर हे प्रत्येक कलाकाराची पंढरी आहे. इथे तळागाळातल्या कलावंतांपासून ते झगमगाटातीळ कलाकारांपर्यंत प्रत्येक जण आपली सेवा देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. अनेक कलाकार हे आपापल्या कामामुळे वर्षंवर्षं एकमेकांना भेटत नाहीत. मात्र या महोत्सवासाच्यानिमित्तानं इथे भेटीगाठी होतात. नवनवीन विषयावर चर्चा होते. वर्षभर नक्की काय-काय झालं, याबद्दल एकत्र येऊन चर्चा होते. कलाकारांचं सगळं काम हे जूनदरम्यान संपून निवांत झालेले असतात. त्यामुळे त्यांनाही एकत्र येण्यासाठी वेळ मिळतो.
खरेतर जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या थिएटरचा वर्धापनदिन इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही. बालगंधर्व रंगमंदिर हे एकमेव रंगमंदिर आहे, जिथे लोक या रंगमंदिराशी भावनिक पातळीवर जोडलेले आहेत. त्याचा वर्धापनदिन त्यांना एखाद्या सणासारखा वाटतो.
ज्या थिएटरच्या जीवावर आपण जगतो, आपली ओळख, आपला मानसन्मान ज्या थिएटरमुळे आपल्याला मिळाला आहे, मिळतो आहे, ज्याच्यामुळे आपलं घर, आपला संसार सुरळीत सुरू आहे, त्याचे आभार मानणे हे आपले कर्तव्यच आहे, असे मला वाटते आणि त्याचसाठी हे तीन दिवस आम्ही बालगंधर्व रंगमंदिराकरिता देतो.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा महोत्सव एक दिवस चालायचा. पण पुणेकरांनी या महोत्सवाला डोक्यावर तर घेतलेच, पण त्यांच्या हृदयातही स्थान दिले. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचं महत्त्व वाढत गेलं. या महोत्सवामध्ये अनेक कलावंत सहभागी होऊ लागले. यामध्ये मग मराठी नाट्य परिषद असेल, बँक स्टेज संघटना, नृत्यपरिषद, लोककला, लावणी अगदी ऑर्केस्ट्रा संघटना अशा विविध संघटना यात एकत्र येऊन हा परिवार वाढत गेला. गेली १४ वर्षं झाली, आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत. यापाठीमागचा हेतू हाच होता की, कलावंतांचं एक स्नेहसंमेलन व्हावं आणि प्रेक्षकांना विनामूल्य कार्यक्रम बघता यावा.
या महोत्सवामध्ये भावगीत, भक्तिगीतांपासून ते शास्त्रीय संगीत, हिंदी गाणी, लावण्या, मुलाखती आणि वैचारिक कार्यक्रम असतातच. सोबतच अनेक चर्चासत्रे, संवादपर कार्यक्रमदेखील होतात. या कार्यक्रमांना त्या त्या क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून आपली या कलाक्षेत्राप्रतीची भावना दर्शवितात.
या महोत्सवासाची सगळ्यात विशेष बाब म्हणजे महिलांसाठी होणार लावणीचा कार्यक्रम. सामान्यतः लावणी हा केवळ पुरुषांनी बघायचा कार्यक्रम अशी धारणा आणि परंपरा आपल्याकडे आहे. मात्र बालगंधर्व महोत्सवाने या सगळ्या परंपरा मोडीत काढून महिलांसाठी लावणीचा शो सुरू केला. या कार्यक्रमाला अख्खे सभागृह तुडुंब भरून वाहत असते. या कार्यक्रमाने तर या महोत्सवाला चार चाँद लावले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
यावर्षीचा महोत्सव हा कोविडच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर होतो आहे. यादरम्यान आमचे अनेक साथीदार आम्हाला सोडून गेले. पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे सगळ्याच कलाकारांच्या मनावरील मरगळ झटकून काढण्यासाठी हा महोत्सव आणखी दर्जेदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी सूर्यदत्ता ग्रुप, वन ओटीटी ग्रुप आणि दैनिक राष्ट्रसंचार असे पार्टनर्स आमचं बळ वाढविण्यासाठी आम्हाला मिळाले आहेत.
नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील अनेक उत्तमोत्तम प्रोग्रॅम या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या लोकधारेमधून सर्व लोककला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जादूचे प्रयोग, कॉमेडी स्किट, बिग बॉसच्या यावेळच्या स्पर्धकांशी गप्पा आहेत. विविध टीव्ही चॅनेलचे संपादकदेखील विविध विषयांवरील चर्चासत्रात भाग घेणार आहेत.
या सगळ्यांमध्ये हा महोत्सव कलाकारांनी कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आयोजिलेला आहे, म्हणून गेली १५ वर्षे आपण ज्येष्ठ कलाकारांना जीवनगौरव हा पुरस्कार देतो आहोत. त्याच्यासोबतीला आपण इतर पुरस्कारदेखील देत असतो. यामध्ये ज्येष्ठ आणि युवा असे दोन पुरस्कार द्यायला सुरुवात केली. त्याचंदेखील प्रमाण वाढलं आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट, मीडियामधील मान्यवर यांनादेखील असे पुरस्कार आपण देतो.
या महोत्सवाची आणखी एक खासियत म्हणजे सगळा कार्यक्रम करीत असताना कोणताच कलाकार एकही पैसा घेत नाही. रंगमंदिराप्रतीची कृतज्ञता, प्रेम समजून विनामूल्य आपली कला सादर केली जाते.बालगंधर्वचे हजारो सदस्य आहेत. पण इथे कसलेच मतदान होत नाही. सर्वांच्या पसंतीने त्यांना हवा तो विभाग दिला जातोय. अध्यक्ष, खजिनदार व विविध कार्यकारिणी असते आणि १६ कमिटी मेम्बर आम्ही निवडतो. आम्ही सर्व जण स्वतःही जबाबदारी घेऊन काम करतो. रवींद्र काळे नावाचे आमचे मित्र होते. जे व्यवस्थापक म्हणून काम करायचे. प्रचंड उत्साही असणारे रवींद्र काळे आणि सोबतीला धनंजय गायकवाड आणि महेश शिंदे यांचे या परिवारातील योगदान फार मोठे आहे. दरवर्षी आम्ही त्यांच्या नावाने कमानी लावतो, त्याला त्यांची नावं देतो. ते आज आमच्यात नाहीत, याची उणीव मात्र आहे.
मनोरंजनासोबतच आम्ही विविध योजनादेखील राबवतो. या वर्षी आम्ही दहावी-बारावीच्या मुलांचा कौतुक सोहळा ठेवला आहे. प्रत्येक कलाकाराला वाटत आपल्याही मुलाचं कौतुक व्हावं, तो पास झाला आहे. तसेच कोरोनाकाळात ज्या ज्या लोकांनी कोविडयोद्धा म्हणून आमच्या कलाकारांना जपलं, अशा लोकांचा सत्कार करणे, तसेच कोरोनाकाळात लक्षात आलं, आरोग्य किती महत्त्वाचं आहे. यामुळे आरोग्य विमा उतरवणं हे कामदेखील आम्ही कलाकारांसाठी करतो. कलाकारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. नटराज आम्हाला येथून पुढेही असंच बळ देवो, ही प्रार्थना.