“भाजपने शिवसेनेच्या बंडखोरांना मोजले ‘इतके’ कोटी”
जालना : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यादरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक आरोप विरोधी पक्षा भाजपवर केला आहे.
राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भाजपने 7000 कोटी रूपये दिल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही असं धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केलं आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे या दोघांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्ही डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते म्हणाले की, एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा?, एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांचा डुप्लिकेट आहे.
दरम्यान, व्यासपीठावर भाषणादरम्यान शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, असं शिवाजीराव चोथे यांनी म्हटलं आहे.