“…तर मग देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, पाटलांचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांनी केला ‘हा’ सवाल
मुंबई | काल (गुरूवार) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड राजभवनात पहायला मिळाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं जाहीर केलं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरूवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. मात्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसत असून विरोधीपक्षांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ‘देवेंद्र फडणवीसांचा बळी भाजपाने का दिला?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यांसारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच त्यांनी आमची सहानुभूती देवेंद्र फडणवीसांसोबत आहे अशा अर्थाचा हॅशटॅग देखील वापरला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे जेवढं धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे, असं मत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व्यक्त केलं आहे.